धिंंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना दणका
By Admin | Updated: October 30, 2015 23:18 IST2015-10-29T23:38:51+5:302015-10-30T23:18:54+5:30
दापोली तालुका : मुरूड समुद्रकिनाऱ्यावरील घटना

धिंंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना दणका
दापोली : तालुक्यातील मुरूड येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी मद्यप्राशन करून समुद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी दापोलीतील जागरूक पत्रकारांनी ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांना त्यांनी आरक्षित केलेल्या खोल्यांमध्ये जाण्यास भाग पाडले. तसेच समुद्रावर धिंगाणा घातल्यास कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशा शब्दात तंबी दिली.
शनिवार आणि रविवारी मुरूड येथे पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळलेली असते. अनेकवेळा मद्यपी पर्यटक आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची होण्याचे प्रकार यापूर्वीही घडले आहेत. तसाच प्रकार नुकताच रात्री समुद्रावर घडला. पर्यटक मद्याच्या नशेत समुद्रावर धिंगाणा घालत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी पत्रकारांजवळ संपर्क साधून पोलिसांना या घटनेची माहिती देण्याची विनंती केली. त्यानुसार पत्रकारांनी पोलीस स्थानकात हा प्रकार सांगितला. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक पी. डी. कांबळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुरूड येथे धाव घेतली. त्यांनी मद्यपी पर्यटकांची चांगली कानउघाडणी केली. त्याचप्रमाणे पर्यटक ज्या रिसार्टमध्ये उतरले होते. तेथील आरक्षित खोलीत त्यांना लगेच जाण्यास भाग पाडले. त्याचप्र्रमाणे समुद्रावर पुन्हा धिंंगाणा घालण्याचा प्रयत्न केलात, तर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला. यामुळे नरमलेल्या मद्यपी पर्यटकांनी आपल्याकडून असा प्रकार पुन्हा घडणार नाही, अशी विनवणी करून पोलिसांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. दरम्यान, मुरूड येथे पर्यटकांनी मद्य पिवून धिंंगाणा घालण्याचा प्रकार नवीन नाही. यापूर्वीही येथे अशा घटना घडल्या होत्या. यामुळे सायंकाळी मुरूड येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, पोलिसांकडून ही मागणी अद्याप पूर्ण न झाल्याने धिंंगाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत जात असल्याचा आक्षेप ग्र्रामस्थांकडून घेतला जात आहे. (प्रतिनिधी)
पोलिसांची तंबी : शनिवार, रविवारी गर्दी
दापोली तालुक्यातील मुरूड याठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मात्र, पर्यटकांच्या अरेरावीमुळे याठिकाणी ग्रामस्थांबरोबर वादविवादही होतात. समुद्रकिनाऱ्यावर धिंगाणा घालणाऱ्या पर्यटकांची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे जाऊन तंबी दिली आणि आरक्षित खोल्यांमध्ये पाठविले.
पोलीस नेमावा
मुरूड किनाऱ्यावर पर्यटकांकडून धिंगाणा घालण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.