कुडाळला बॅनरचा विळखा

By Admin | Updated: September 22, 2015 00:12 IST2015-09-21T21:54:39+5:302015-09-22T00:12:32+5:30

प्रशासनाचे दुर्लक्ष : जुने फलक कोसळण्याच्या अवस्थेत

Bundle of Kudal bunar | कुडाळला बॅनरचा विळखा

कुडाळला बॅनरचा विळखा

रजनीकांत कदम -कुडाळ  कुडाळ शहरामधील रस्त्याच्या कडेला बॅनरबाजीचे प्रमाण वाढत असून, काही बॅनर तर गेले कित्येक महिने काढलेच गेले नसल्याने ते कमकुवत होऊन कोसळण्याच्या अवस्थेत आहेत. यामुळे वाहनचालक, पादचाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. या वाढत्या धोकादायक बॅनरबाजीकडे प्रशासनानने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
स्पर्धेच्या या वाढत्या युगात आता शुभेच्छा देण्यासाठी किंवा इतर मते व्यक्त करण्यासाठी स्पेलश मीडियाबरोबर डिजिटल बॅनरच वापर मोठ्या प्रमाणात हल्ली वाढत आहे. तत्काळ हवा तसा मजकूर छापून मिळत असल्याने सगळीकडे डिजिटल बॅनरचा वापर मोठ्या प्रमाणात होत असताना दिसत आहे. बहुतेक करून रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या या बॅनरबाजीचा ऊत आता कुडाळ शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कुडाळ पोलीस ठाणे येथील शहराच्या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी वाढत आहे. या बॅनरबाजीमध्ये राजकीय पक्ष सामाजिक संघटना तसेच इतर छोट्यामोठ्या लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
शहरामध्ये लावण्यात आलेले काही बॅनर ज्या राजकारणासाठी लावण्यात आले आहेत. ते कारण होऊन कित्येक महिने लोटले, तरी नंतर मात्र तिथेच असतो. त्यामुळे अशा बॅनरच्या लाकडी चौकडी खराब झाल्याने हे बॅनर रस्त्यावर कोसळण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे एखादा अपघातही येथे घडू शकतो.
शक्यतो शहरात लावण्यात येणाऱ्या बॅनरना प्रशासनाकडे परवानगी लागत असते. असा नियम आहे. ज्यावेळी जो बॅनर लावण्यासाठी परवानगी दिली जाते, तो बॅनर किती काळासाठी असेल, त्याचा कालावधीही प्रशासनाकडून नमूद केलेल्या असते. मात्र, येथे लावण्यात आलेले सर्वच बॅनर परवानगी घेऊन लावण्यात आले आहेत का? की नाहीत? याबाबत जनतेत मतभिन्नता आहे. त्यामुळे या परवानगीचे गौडबंगाल नेमके काय आहे? याची उत्सुकता जनतेला लागुन राहीली आहे.
काहीवेळा आक्षेपार्ह बॅनर लावले जातात. मग त्यामुळे वातावरण तापण्यास सुरूवात होते. पोलीस प्रशासनामार्फत ही गोष्ट गेली की, पोलीस प्रशासन हे बॅनर काढतात व वातावरण शांत ठेवतात. त्यामुळे असे बॅनर लावायला परवानगी कोण देते? अशाप्रकारच्या अनेक घटना गेल्या वर्षभरापूर्वी घडल्या होत्या. काही बॅनर लावण्यात येतात. मात्र, ते जमिनीवर न बांधता ठेवलेले असतात. तर काही बॅनरांची लाकडी चौकड चांगली नसते. दोरीही चांगली बांधण्यात येत नाही. असे बॅनर धोकादायक स्थितीतील बॅनर वाद निर्माण करणारे ठरतात.
वाढत्या बॅनरबाजीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व धोकादायक स्थिती कमी करण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक बॅनरवर हा प्रशासनाच्या परवानगीने लावण्यात यावा, बॅनरचा कालावधी निश्चित करावा, कालावधी संपल्यानंतर तो बॅनर काढून न नेणाऱ्यांवर तसेच परवानगी शिवाय ज्यांनी बॅनर लावले, अशांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, बॅनरमुळे धोका निर्माण होऊ नये, अशा पध्दतीत बॅनर लावण्याच्या सक्त सूचना देण्यात आली. भविष्यात या बॅनरमुळे एखादी दुर्घटना होऊ नये, वातावरण बिघडू नये, यासाठी प्रशासनाने येथील बॅनर लावण्यासंदर्भात योग्य ती नियमावली जाहीर केली पाहिजे. जेणेकरून बॅनर लावायचे असतील, त्यांना रितसर परवानगी मिळेलच, शिवाय बॅनरही चांगल्या स्थितीत राहील व धोकाही निर्माण होणार नाही.
जसा लावतो तसा काढावा
ज्या पध्दतीने आपण बॅनर लावतो, त्या पध्दतीने तो बॅनर ठराविक कालावधी झाल्यानंतर काढणे हे प्रत्येक बॅनर लावणाऱ्याचे कर्तव्य आहे. अन्यथा बॅनर लावणाऱ्यांची व बॅनरवरील असणाऱ्या छब्या यांची पुरती हालत पाहण्याजोगी होत असते.


बसस्थानकातील बॅनर कोसळताहेत
काही दिवसांपूर्वी कुडाळ बसस्थानकावरील लोखंडी चौकटीचा भलामोेठा बॅनर भरदिवसा गर्दीच्यावेळी कोसळला होता. मात्र, तो एसटी बसवर कोसळल्याने अडकला. नाही तर मोठे नुकसान झाले असते. अशाप्रकारे शहरात बऱ्याच ठिकाणी धोकादायक बॅनर रस्त्याच्या कडेला आहेत. मात्र, त्याकडे बॅनर लावणाऱ्यांचे व प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले असून, हे धोकादायक बॅनरपैकी एखादा बॅनर चालत्या वाहनावर किंवा पादचाऱ्यांवर कोसळून दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण. हा प्रश्न अनुत्तरीतच राहत आहे.

Web Title: Bundle of Kudal bunar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.