दोडामार्ग ग्रामसचिवालय इमारतीचे
By Admin | Updated: November 9, 2014 23:35 IST2014-11-09T21:25:48+5:302014-11-09T23:35:56+5:30
काम लवकरच सुरु होणार : नानचे

दोडामार्ग ग्रामसचिवालय इमारतीचे
दोडामार्ग : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजनमधून कसई- दोडामार्ग ग्रामपंचायतीला ‘ग्रामसचिवालय’ नूतन इमारत बांधकामासाठी दहा लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भविष्यात या ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणार आहे. त्या अनुषंगाने जुन्या आराखड्यात बदल करून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या काही महिन्यातच ग्रामसचिवालयाची इमारत उभारणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सरपंच संतोष नानचे यांनी दिली.
कसई-दोडामार्ग ग्रामपंचायतीच्या इमारतीला लागूनच एकूण चौदा गुंठे जागेत ग्रामसचिवालयाची इमारत बांधण्यात येणार आहे. या इमारतीसाठी नारायण राणे यांनी जिल्हा नियोजनमधून दहा लाखाचा निधी मंजूर केला. जिल्हा नियोजनाच्या बैठकीत हा निधी राणे यांनी मंजूर करून दिल्याचे नानचे यांनी सांगितले. या ग्रामपंचायतीची जुनी इमारत सध्याच्या इमारतीला लागून आहे. ही इमारत पूर्णपणे कोसळलेल्या अवस्थेत असून मातीचा ढीग साचलेला होता. या ठिकाणी ग्रामसचिवालयाला निधी मंजूर झाल्याचे ग्रामपंचायतीला कळविताच सरपंच नानचे यांनी ही जागा सपाटीकरणाचे काम हाती घेतले आहे.
दोडामार्ग ग्रामपंचायतीची भविष्यात नगरपंचायत होणार असल्यामुळे त्या अनुषंगाने पूर्वीचा आराखडा बदलून तो नव्याने पाठविण्यात आला आहे. मंजूर निधीमधून इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊ शकत नसल्यामुळे वाढीव निधीची मागणी केली आहे. इमारतीचा नवीन आराखडा तयार होऊन मिळताच कामाला सुरुवात होणार असून येत्या काही महिन्यातच ग्रामसचिवालयाची सुसज्ज इमारत उभी राहणार असल्याचे सरपंच संतोष नानचे यांनी सांगितले. (वार्ताहर)