इमारत बांधकाम निकृष्ट
By Admin | Updated: August 14, 2014 22:37 IST2014-08-14T21:05:58+5:302014-08-14T22:37:36+5:30
राजन नाईक : कुडाळ ग्रामपंचायत उद्घाटनाला विरोध

इमारत बांधकाम निकृष्ट
कुडाळ : कुडाळ शहर ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून स्लॅबमधूनही पाणी इमारतीत येत आहे. या इमारतीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य राजन नाईक यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत केला. इमारतीचे उद्घाटन करण्यापेक्षा अगोदर इमारतीचे काम चांगले करा. त्यानंतर खास ग्रामसभेच्या सल्ल्यानेच उद्घाटन करा, असा सल्लाही नाईक यांनी कुडाळ सरपंच व सत्ताधाऱ्यांना दिला.
कुडाळ शिवसेना शाखेमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, ग्रामपंचायत सदस्य नितीन सावंत उपस्थित होते. यावेळी राजन नाईक म्हणाले, शहर ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे बांधकाम मुदतीच्या बाहेर गेले आहे.
इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून स्लॅब व भिंतीतून पाणी आतमध्ये येत आहे. सगळ्या भिंतींना ओल आली असून टाईल्सही जुन्या पद्धतीचे वापरण्यात आले आहेत. सर्व निधी पोच असूनही काम निकृष्ट असलेल्या या इमारतीचे उद्घाटन करण्याची घाई केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन जरूर करावे. पण ते पूर्ण काम करूनच. उगाचच उद्घाटनाबाबत घाई करू नये. या कालावधीत आचारसंहिता लागल्यास ज्येष्ठ व्यक्तीकडून उद्घाटन करावे, असा सल्ला उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट यांनी दिला. (प्रतिनिधी)