ब्रिटिशकालीन थिबा पॅलेस दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
By Admin | Updated: September 10, 2015 00:48 IST2015-09-10T00:47:46+5:302015-09-10T00:48:12+5:30
ऐतिहासिक वाडा : गतवैभव परत येणार

ब्रिटिशकालीन थिबा पॅलेस दुरुस्तीच्या कामाला सुरुवात
रत्नागिरी : रत्नागिरी शहराला ऐतिहासिकदृष्ट्या महत्व प्राप्त करून देणाऱ्या थिबा राजवाड्याच्या देखभाल दुरूस्तीचे काम सुरू झाले आहे. पहिल्या टप्यातील काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्यातील कामाला प्रारंभ झाला आहे. शतक पूर्ण करणाऱ्या राजवाड्याचे बांधकाम ब्रिटिशकालीन असल्यामुळे राजवाड्याच्या पूर्वसौंदर्याला बाधा न आणता दुरूस्तीचे काम सुरू आहे.
राजवाड्याच्या दुरूस्तीच्या पहिल्या टप्प्याच्या कामाला जुलै २०१४ पासून प्रारंभ झाला. छताचे काम पूर्णत: लाकडी असून, त्यावर कौले बसविण्यात आली होती. त्यामुळे दुरूस्ती करताना सागवानी लाकडाचा वापर करून छताची दुरूस्ती करण्यात आली आहे.
चांगल्या दर्जाची कौले असून ती ‘स्पेन’हून मागवण्यात आली आहेत. छताचे काम पूर्ण झाले आहे. पहिल्या टप्प्यात एक कोटीचे काम करण्यात आले आहे. राजवाड्याच्या दर्शनी भागातील छताचा काही भाग कोसळला होता. राजवाड्याने शतक पूर्ण केले असल्यामुळे दुरूस्तीचे काम करत असतानाच जुने बांधकाम ढासळत असल्यामुळे दुरूस्तीचे काम वाढत आहे.
दुसऱ्या टप्प्यातही एक कोटीची कामे करण्यात येणार आहेत. त्यामध्ये भिंतीचे प्लास्टर, फरशा बदलणे व रंगरंगोटी करण्यात येणार आहे. फरशा आणण्यात आल्या आहेत. याशिवाय राजवाडा परिसर विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राजवाड्याला भेट देण्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी २० हजार लीटरची टाकी बांधण्यात येणार आहे. टाकीच्या बांधकामाला प्रारंभ झाला आहे. याशिवाय पर्यटकांसाठी स्वच्छतागृह, शौचालये बांधण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी उपाहारगृह उभारण्यात येणार आहे. राजवाड्याचे मुख्य प्रवेशव्दार सुशोभित करण्यात येणार आहेत. त्याशिवाय रस्ता दुरूस्ती व पार्किंग सुविधादेखील करण्यात येणार आहे. राजवाड्याच्या प्रांगणात हिरवळ व शोभेची झाडे लावण्यात येणार आहेत. राजवाडा देखभाल दुरूस्तीचे काम सुरू असले तरी पर्यटकांसाठी केवळ तीनच दालने खुली करण्यात आली आहेत. त्यामध्ये थिबा संस्कृती, रत्नागिरी व पर्यटन स्थळांचे फोटो, तर काही पुतळे मांडण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)