काळसे गोसावीवाडीत पूल ढासळला
By Admin | Updated: October 30, 2014 00:46 IST2014-10-30T00:45:04+5:302014-10-30T00:46:31+5:30
संपर्क पूर्णपणे खंडित : अतिवृष्टीमुळे भरावाला तडे

काळसे गोसावीवाडीत पूल ढासळला
चौके : मालवण तालुक्यातील काळसे गोसावीवाडीमध्ये जाण्यासाठी वाडीनजिक असणारा पूल चिरे वाहतूक करणारा डंपर रुतून कलंडल्यामुळे ढासळला. सुदैवाने चिऱ्यांनी भरलेला डंपर ओढ्यात न कोसळता पुलाच्या कठड्याला अडकून राहिला. त्यामुळे त्यावर बसलेल्या कामगारांचा जीव वाचला आणि मोठा अनर्थ टळला.
यामध्ये डंपरचे नुकसान झाले असून पुलाच्या एका बाजूचा भराव आणि त्याच्या दोन्ही दिशेचे बांधकाम कोसळल्याने गोसावीवाडीतील ग्रामस्थांचा बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. रात्री उशिरा क्रेनच्या सहाय्याने डंपर बाहेर काढण्यात यश आले. गोसावीवाडीमध्ये ये-जा करण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्यामुळे तोच मार्ग कोसळल्याने वाडीतील लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटल्यासारखाच आहे.
वाडीतील काहीजणांची वाहने पुलाच्या पलिकडे अडकल्याने त्यांना नोकरी- व्यवसायाच्या ठिकाणी जाण्यासाठी पर्याय शोधावा लागत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांना यावरून पाठवता येत नसल्याने त्यांना शाळेत जाणे मुश्किल होणार आहे. त्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी तसेच लवकरात लवकर संबंधित बांधकाम विभागाने या कोसळलेल्या पुलाचे बांधकाम करून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यासाठी वाडीतील ग्रामस्थांनी अनेक नेत्यांकडे या पुलाच्या पुनर्बांधणीची मागणी केली होती. गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूल आणखी कमकुवत होऊन अखेर ढासळला आहे.
अपघात झाल्यानंतर वाडीतील तरूण सतिश गोसावी, जितेंद्र गोसावी, तुषार गोसावी, सुमन गोसावी, सुहास गोसावी, ओंकार गोसावी, भरत गोसावी, रंगनाथ आजगावकर, संतोष सावंत यांनी मदतकार्य केले. (वार्ताहर)