बीपीएलधारकांना अधिक ‘शर्करा योग’

By Admin | Updated: August 21, 2014 00:25 IST2014-08-20T21:37:01+5:302014-08-21T00:25:46+5:30

निवडणुकीवर डोळा : आता मिळणार ६०० ग्रॅम साखर

BPL beneficiaries get more 'sugar yoga' | बीपीएलधारकांना अधिक ‘शर्करा योग’

बीपीएलधारकांना अधिक ‘शर्करा योग’

रत्नागिरी : दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना आॅगस्टमध्ये प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम साखर उपलब्ध झाली आहे. नजीकच्या काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने त्यात अधिक १०० ग्रॅम साखरेचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ७३ हजार बीपीएलधारकांसाठी साखर अधिकच गोड होणार आहे.
शासनाने यापूर्वी कितीही घोषणा केल्या तरी आतापर्यंत साखर, पामतेल, डाळ आदी वस्तू रेशनदुकानातून कधीच गायब झाल्या होत्या. त्यामुळे साखर सामान्यांकरिता कडू झाली होती. नाईलाजाने काळ्या बाजाराने ती खरेदी करावी लागत होती. मात्र, आता निवडणूक कालावधी जवळ आल्याने बीपीएलधारकांना जुलै महिन्यासाठी ५०० ग्रॅम साखर उपलब्ध झाली होती. त्याचे वितरण आॅगस्टमध्ये सुरू झाले आहे. जिल्ह्यासाठी एकूण १८०३ क्विंंटल साखरेचे नियतन मंजूर झाले होते. दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिका धारकांना प्रतिव्यक्ती ५०० ग्रॅम साखर या प्रमाणात संबंधित रास्त दर धान्य दुकानातून १३ रुपये ५० पैसे प्रतिकिलो दराने वितरीत करण्यात येतआहे. मात्र, केशरी व शुभ्र शिधापत्रिकाधारकांना ही साखर कडूच होती.
आगामी निवडणुका लक्षात घेऊन शासनाने आॅगस्टच्या नियतनामध्ये बीपीएलधारकांना आणखी १०० ग्रॅम साखर जादा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी या महिन्याचे साखरेचे नियतन २३८५ क्विंटल इतके मंजूर झाले आहे. गेल्या महिन्यापेक्षा ५८५ क्विंटल इतकी वाढ या महिन्यात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बीपीएलधारकांसाठी निवडणुकीच्या निमित्ताने का होईना साखर अधिक गोड होणार आहे.
साखर मिळाली असली तरी विविध कडधान्ये, पामतेल यांची अजूनही वानवा आहे. या वस्तू दुकानातून अव्वाच्या सव्वा दराने खरेदी कराव्या लागत आहेत. त्यामुळे या वस्तूही शासनाने रास्त दर धान्य दुकानांवर उपलब्ध करून द्यावात, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)
गणेशोत्सव होणार गोड...
गणेशोत्सवात आता दारिद्र्यरेषेखालील जनतेला ५०० ग्रॅम साखर देण्याची घोषणा झाली. त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा १०० ग्रॅम अधिक म्हणजे आता ६०० ग्रॅम साखर मिळेल.
शासनाने यापूर्वी घोषणा केलेले साखर, पामतेल, डाळ आदी वस्तू सर्व रेशनदुकानांतून कधीच गायब झाल्या होत्या. साखर तर कडूच झाली होती.
निवडणूक कालावधी जवळ आल्याने बीपीएलधारकांना ५०० ग्रॅम साखरेची घोषणा झाली. त्यानंतर काही दिवसांतच अधिक १०० ग्रॅम साखरेचा बोनसही जाहीर झाला आहे.

Web Title: BPL beneficiaries get more 'sugar yoga'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.