‘त्या’ समारंभावर ग्रामसेवक संघटनेचा बहिष्कार : वारंग

By Admin | Updated: August 12, 2014 23:12 IST2014-08-12T22:14:46+5:302014-08-12T23:12:42+5:30

प्रशासनाकडून विलंब,कंत्राटी ग्रामसेवकांच्या अनामत रकमा परत मिळालेल्या नाहीत

The boycott of Gramsevak Sangh: 'Warang' | ‘त्या’ समारंभावर ग्रामसेवक संघटनेचा बहिष्कार : वारंग

‘त्या’ समारंभावर ग्रामसेवक संघटनेचा बहिष्कार : वारंग

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला पर्यावरण विकासरत्न पुरस्कारामध्ये राज्यात प्रथम आणण्यात मोलाचा वाटा ग्रामसेवकांचा आहे. मात्र, ग्रामसेवक संवर्गातील सेवाविषयक प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे विकासरत्न पुरस्कार समारंभावर ग्रामसेवक संघटनेने बहिष्कार घातला आहे, असे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वारंग व सचिव सुनिल पांगम यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
गेले ६ महिने रखडलेली विस्तार अधिकारीपदांची पदोन्नतीची फाईल विलंबाच्या कारणास्तव लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये अडकली होती. आता पुन्हा विधानसभेच्या आचारसंहितेमध्ये ही फाईल रखडविण्याचा प्रशासनाचा विचार आहे. अशाच विलंबामुळे कोकण विभागात सेवाज्येष्ठतेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्तार अधिकारी मागे पडले आहेत. ग्रामसेवकांच्या बदलीचे प्रस्ताव अद्याप आयुक्तांकडे सादर झालेले नाहीत. ग्रामसेवक पावरा यांना न्यायालयाने दोषमुक्त केले असूनही गेले सहा महिने त्यांना सेवेत पुन:स्थापित केलेले नाही. तसेच अन्य चार निलंबित ग्रामसेवक, विस्तार अधिकारी यांची पदस्थापना रखडली आहे.
सन २०१४-१५ चे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार अद्याप मंजूर झालेले नाहीत. तसेच अनिल कांबळी या मृत ग्रामसेवकावर अन्यायकारक नियमबाह्य १०० टक्के आर्थिक जबाबदारी निश्चित करून त्यांच्या कुटुंबियांवर अन्याय करण्यात आला आहे. बदली झालेल्या ग्रामसेवकांची नियमबाह्य एलपीसी रोखून उपासमारी व सेवा पुस्तके रोखून ग्रामसेवकांना मानसिक त्रास देण्याचा प्रकार प्रशासनाकडून होत आहे.
तीन वर्षे कंत्राटी सेवा पूर्ण होऊनही ग्रामसेवकांना सेवेत नियमित करण्यास प्रशासनाकडून विलंब केला जात आहे. तसेच कंत्राटी ग्रामसेवकांच्या अनामत रकमा परत मिळालेल्या नाहीत. यासह अन्य अनेक मागण्यांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने व ग्रामसेवकांच्या मागण्यांबाबत प्रशासन संवेदनशील नसल्याने जिल्ह्यातील एकही ग्रामसेवक पुणे येथे १४ आॅगस्टला होणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभाला जाणार नसल्याचे संघटनेच्यावतीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The boycott of Gramsevak Sangh: 'Warang'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.