बंधाऱ्यांची कामे रखडली
By Admin | Updated: November 30, 2014 00:50 IST2014-11-30T00:43:51+5:302014-11-30T00:50:30+5:30
कणकवलीत ६१ प्रस्तावित : पाणीवापर संस्थांची नोंदणी नाही

बंधाऱ्यांची कामे रखडली
मिलिंद पारकर ल्ल कणकवली
जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी पक्के बंधारे बांधण्याचे काम पाणीवापर संस्था नोंदणी होत नसल्याने रखडले आहे. फक्त कणकवली तालुक्यात ६१ ठिकाणचे बंधारे पाणीवापर संस्था अस्तित्वात न आल्याने रखडले आहेत. गेल्या वर्षी फक्त २ बंधारे तालुक्यात होऊ शकले.
लघुपाटबंधारे विभागाकडून पाच पाटबंधारे शीर्षअंतर्गत पक्के बंधारे बांधण्यात येतात. कोल्हापूर टाईप, वळवणी आणि ब्रिजकम बंधारे पाणी अडवणे आणि वळवण्यासाठी बांधले जातात. या शीर्षाखाली एखाद्या गावात बंधारा बांधण्यासाठी पाणीवापर सहकारी संस्था नोंदणी करणे आवश्यक ठरते.
गावपातळीवर स्थापन झालेल्या अशा संस्था बांधलेल्या बंधाऱ्याच्या देखभालीसाठी जबाबदार ठरतात. बंधाऱ्याच्या सिंंचन क्षेत्राखाली येणाऱ्या लाभार्थ्यांकडून पाणीवापर संस्था क्षेत्रानुसार शुल्क आकारते. त्यातील ८० टक्के रकमेचा देखभाल दुरूस्तीसाठी वापर केला जातो तर २० टक्के रक्कम शासनाकडे जमा केली जाते. ही पाणीवापर संस्था बंधाऱ्याच्या फळ्या काढणे, लावण्याची जबाबदारी घेते. मात्र, पाणीवापर संस्था नोंदणी होत नसल्याने बंधाऱ्यांची कामे रखडत आहेत. बंधारा बांधल्यानंतर त्याच्या देखभालीची जबाबदारी, पाण्याचा वापर करणे आणि पाण्याच्या वापराच्या प्रमाणात शुल्क आकारणे या कामांची जबाबदारी गावपातळीवर घेतली जाणे आवश्यक असते. मात्र, याबाबत ग्रामस्थांमधून उदासीनता दिसून येते.
तर पाणीवापर संस्था स्थापन करण्यास गावातून सहमती मिळाल्याने हरकुळ कोटेश्वर बंधारा, हरकुळ बुद्रुक मराठी शाळेनजीक बंधारा, सांगवे जॅकवेलनजीक बंधारा, तिवरे वाळवेवाडी, साकेडी वरचीवाडी, ओसरगांव कानसळीवाडी, कसवण-तळवडे, शिवडाव तांबळवाडी, माईण धरणानजीकचा बंधारा, भरणी नळयोजना उद्भवाजवळील बंधारा व ओसरगांव पारभाटले बंधाऱ्याच्या कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. त्यातील हरकुळमधील दोन कामे पूर्ण झाली.