बोगस पदवीधर शिक्षकांची चौकशी होणार

By Admin | Updated: November 16, 2014 00:23 IST2014-11-16T00:22:27+5:302014-11-16T00:23:00+5:30

शिक्षण विभाग : अलाहाबाद मुक्त विद्यापीठाच्या पदवीधरांचाही समावेश

Bogus graduate teachers will be questioned | बोगस पदवीधर शिक्षकांची चौकशी होणार

बोगस पदवीधर शिक्षकांची चौकशी होणार


रहिम दलाल / रत्नागिरी
परराज्यातील विद्यापीठातून बोगस पदवी धारण केलेल्या जिल्हा परिषदेच्या बोगस पदवीधर शिक्षकांची चौकशी करण्यात येणार असल्याने शिक्षकवर्गामध्ये खळबळ उडाली आहे़ या बोगस पदव्यांकडे जिल्हा परिषद शिक्षण विभाग कानाडोळा करीत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे़
शिक्षण अर्धवट राहिलेल्या अनेकजणांनी मुक्त विद्यापीठातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राज्यातील मुंबई मुक्त विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथून पदवी घेतली आहे़ कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली व अन्य राज्यातील मुक्त विद्यापीठातून हजारो लोकांनी पदव्या मिळविल्या आहेत. इतर शासकीय कार्यालयांमध्ये नोकऱ्या करणारे आणि जिल्हा परिषदेतील अनेक प्राथमिक शिक्षकांनी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद मुक्त विद्यापीठातून पदव्या धारण करुन त्याद्वारे पदोन्नती मिळविण्यासाठी धडपड सुरु केली आहे.
गेल्या चार-पाच वर्षांमध्ये शिक्षण विभागाने अलाहाबाद मुक्त विद्यापीठातून पदवी घेतलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नतीही दिलेली आहे. त्यावेळी शिक्षण विभागाकडून त्याबाबत काहीही चौकशी न करताच त्या शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली होती. नुकत्याच झालेल्या पदवीधर शिक्षकांच्या पदोन्नतीच्यावेळी जिल्ह्यातील १४० प्राथमिक शिक्षकांनी अलाहाबाद मुक्त विद्यापीठातून पदवीधर झाल्याचे समोर आले होते़ त्यावेळी ती पदवी बोगस ठरवून तत्कालीन शिक्षण सभापती सतीश शेवडे यांनी त्या शिक्षकांना पदोन्नती नाकारली. पदोन्नती नाकारल्याने त्या शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. संबंधित शिक्षण विभागाने यापूर्वी अलाहाबाद विद्यापीठातून पदवीधर झालेल्या शिक्षकांना पदोन्नती कशी देण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला होता़
यापूर्वीही अलाहाबाद मुक्त विद्यापीठ व परराज्यातील इतर विद्यापीठांकडून बोगस पदवी धारण केलेल्या शिक्षकांना पदोन्नती देण्यात आली होती़ त्या शिक्षकांची चौकशी करुन पदोन्नती रद्द करण्याची गेल्या अनेक महिन्यांपासूनची मागणी काही शिक्षकांनी केली होती़ त्याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले होते़ मात्र, शिक्षण समितीच्या सभेत याविषयी जोरदार चर्चा झाली़ सदस्य विलास चाळके व अन्य सदस्यांनी बोगस पदवीधर असलेल्या शिक्षकांची चौकशी करण्याची मागणी केली़ त्यामुळे आता या बोगस पदवी धारण करुन पदोन्नती देण्यात आलेल्या शिक्षकांची चौकशी करण्यात येणार आहे़

Web Title: Bogus graduate teachers will be questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.