खाडीत होडी उलटली
By Admin | Updated: July 12, 2014 00:21 IST2014-07-12T00:15:00+5:302014-07-12T00:21:53+5:30
खलाशी सुखरुप : आनंदवाडी मळई येथील घटना

खाडीत होडी उलटली
देवगड : आनंदवाडी मळई खाडी येथील ज्ञानेश्वर मालवणकर व महेश जोशी हे खलाशी शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील फायबर होडीतून मासेमारी करत असताना अचानक लाटेच्या तडाख्याने त्यांची होडी उलटली. या घटनेने दोघेही तोल जाऊन पाण्यात पडले. मात्र, प्रसंगावधान राखून त्यांनी एअरटॅँकचा आधार घेत जीव वाचवला.
सुमारे तासाभराने ७ वाजण्याच्या सुमारास ही होडी देवगड पाणखोल भागात किनाऱ्याला लागली. दरम्यान, आनंदवाडी व परिसरातील मच्छिमारांनी तेथे धाव घेऊन दोघांनाही किनाऱ्यावर आणले.
ज्ञानेश्वर मालवणकर व महेश जोशी हे फायबर होडीने मच्छिमारीसाठी खाडीत गेले होते. मात्र उसळणाऱ्या लाटांचा अंदाज न आल्याने होडी सावरण्याच्या नादात हे दोघेही सकाळी पाण्यात पडले. मुसळधार पाऊस व वारा याबरोबरच लाटांच्या जोरामुळे पोहणे मुश्किल होते. मात्र, प्रसंगावधान राखून होडीच्या फायबर एअरटॅँकचा आधार त्यांनी घेतला. दरम्यान, उलटलेल्या होडीमध्ये परत शिरणे त्यांना अशक्य होते. त्यामुळे ते दोघेही तसेच टॅँकच्या आधाराने तरंगत राहिले. वाऱ्याच्या जोरामुळे पाणखोलकडे ही उलटलेली होडी व दोघेही खलाशी तरंगत किनाऱ्यावर येऊन थडकले. या दरम्यान होडी उलटल्याची माहिती किनाऱ्यावरील मच्छिमारांना मिळाली होती. त्यांनी होडीचा वेध घेत पाणखोल गाठले व या दोन्ही मच्छिमारांना किनाऱ्यावर ओढून घेतले. तसेच होडी सरळ करण्यास त्यांना मदत केली.
सध्या समुद्रामध्ये मच्छिमारीस बंदी आहे. त्यामुळे सर्व मच्छिमारी नौका मच्छिमारीपासून दूर असून त्या किनाऱ्यावरच नांगरून ठेवलेल्या आहेत. तरीही काही हौशी मच्छिमार किनाऱ्यावर आपली मत्स्यभूक भागविण्यासाठी जीवावरच्या संकटालाही सामोरे जायला तयार होतात व त्यामुळेच अपघात होतात. याची जाणीव तरूण मच्छिमारांनी ठेवावी व धाडस करू नये, असे मत वृद्ध व जाणकार मच्छिमार व्यक्त करीत आहेत. याबाबत देवगड पोलीस स्थानकात कुठलीही नोंद उशिरापर्यंत झालेली नव्हती. (प्रतिनिधी)