मुलीच्या अंत्यसंस्कारावेळी विजापुरात जावयाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:11 IST2018-11-26T23:11:15+5:302018-11-26T23:11:20+5:30
देवगड : पती आणि सासूच्या जाचाला कंटाळून पेटवून घेतलेल्या काजल राजू तांबे (वय २१, मूळ रा. किल्लार तांडा, विजापूर) ...

मुलीच्या अंत्यसंस्कारावेळी विजापुरात जावयाचा खून
देवगड : पती आणि सासूच्या जाचाला कंटाळून पेटवून घेतलेल्या काजल राजू तांबे (वय २१, मूळ रा. किल्लार तांडा, विजापूर) या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेह विजापूर येथील किल्लार तांडा येथे अंतिम संस्कार करण्यासाठी नेण्यात आला होता. अंत्यसंस्कारावेळी तिच्या वडिलांनी व माहेरच्या २० ते २५ लोकांनी पती राजू तांबे याच्या डोक्यात लाकडी दांड्याने जोरदार मारहाण करून त्याला जागीच ठार केले.
ही घटना रविवारी विजापूर येथील किल्लार तांडा येथील स्मशानभूमीत घडली. याप्रकरणी काजलचे वडील नागू पांढरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे, पडेल कँटिंग येथे कित्येक वर्षांपासून राजू तांबे व त्याचे वडील शिवाजी तांबे, भाऊ संजय तांबे, आई जायनाबाई तांबे राहत होते. राजू तांबे याचे लग्न काजलशी दोन वर्षांपूर्वी झाले होते. लग्न झाल्यापासून काजल हिला पती राजू व सासू जायनाबाई विनाकारण जाच करून मारहाण करायची. याच जाचाला कंटाळून बुधवारी ( दि. २१) रात्री ११.४५ वा.च्या सुमारास डिझेल अंगावरती ओतून तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात ती ९0 टक्के भाजल्याने चार दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर ओरोस जिल्हा रुग्णालयात शनिवारी ( दि. २४) ११ वा.च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह रविवारी सकाळी नातेवाईक व पती राजू तांबे विजापूर किल्लार तांडा येथे गावी अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले होते.
किल्लार तांडा येथे रविवारी ( दि. २५) रात्री ७.३0 ते ८.00 वा.च्या सुमारास काजल हिला स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारावेळी काजलचे वडील नागू पांढरे व काजलच्या माहेरच्या २५ जणांनी काजलला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिचा पती राजू तांबे याच्या डोक्यावरती लाकडाने जोरदार मारहाण केली. ही मारहाण एवढी जबरदस्त होती की, स्मशानभूमीमध्येच पत्नीचा मृतदेह जळतेवेळीच त्याचा मृत्यू झाला. तसेच त्यावेळी तेथे उपस्थित राजूचे वडील शिवाजी तांबे, आई जायनाबाई व भाऊ संजय तांबे यांना देखील मारहाण करण्यात आली. यात संजय तांबे यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. याप्रकरणी विजापूर येथील बबलेश्वर पोलीस ठाण्यामध्ये राजू तांबे याला ठार मारल्याप्रकरणी काजलचे वडील नागू पांढरेसहीत २५ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागू पांढरे याला बबलेश्वर पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.
विजयदुर्ग पोलिसांचा चालढकलपणा
काजल तांबे हिला जाच करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विजयदुर्ग पोलीस ठघण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. काजल हिनेही उपचारादरम्यान आपण पती राजू तांबे व सासू जायनाबाई तांबे हिच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले होते. दरम्यानच्या कालावधीत विजयदुर्ग पोलिसांनी राजू तांबे व जायनाबाई तांबे यांना अटक करणे महत्त्वाचे होते. मात्र, विजयदुर्ग पोलिसांचीच कामगिरी संशयास्पद असल्याने या प्रकरणातील राजू तांबे याचा खून झाला आहे. जर राजू तांबे याला विजयदुर्ग पोलिसांनी अटक केली असती तर असा खुनाचा प्रकार घडला नसता, अशी चर्चा सुरू होती.