संदीप बोडवेमालवण: अंधांना अनुभूती होते ती स्पर्शातून. त्यांना फक्त स्पर्शाची भाषा कळते. नातेवाईक म्हणाले तुम्ही अंध आहात, तूम्ही काय बघणार, तुम्हाला काय दिसेल? परंतु आमचा सिक्स सेन्स एवढा पावरफुल असतो की त्यामुळे आम्ही आमच्या आजूबाजूचे जग अनुभवतो. सिंधुदुर्ग किल्ल्यात आम्ही बोटीने गेलो तेव्हा समुद्राच्या लाटा काय असतात, याचा थरार आम्ही अनुभवला. सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्यता आम्ही आमच्या मनात साठवली आहे. हे शब्द आहेत नाशिक येथील द ब्लाइंड वेल फेअर ऑर्गनायझेशन इंडियाच्या अंध बांधवांचे.नाशिक, पुणे, मुंबई, अहमदनगर येथील द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर, सचिव दत्तात्रय पाटील यांसह ६० हून अधिक अंध सदस्य आपल्या परिवारासह मालवण येथे सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आले होते. यावेळी बोलताना द ब्लाइंड वेलफेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर म्हणाले, येथे येवून आज मला अतिशय आनंद झाला आहे. दररोजचा जो ताण तणाव असतो तो ताणतणाव कुठेतरी कमी व्हायला हवा या उद्देशाने आम्ही फिरायला बाहेर पडलो आहोत. २० ते २५ डिसेंबर या कालावधीत पंढरपूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग किल्ला आणि तारकर्ली बीच आदी व इतर ठिकाणी देखील आम्ही जाणार आहोत. या प्रवासात मालवण येथील लायन्स क्लबचे विशेष सहकार्य लाभले. अंध बांधव आणि त्यांच्या परिवाराच्या राहण्या - जेवणापासून अन्य सुविधांसाठी लायन्स क्लबने मदत केली. क्लबचे अध्यक्ष महेश अंधारी, मुकेश बावकर, अरविंद ओटवणेकर, मिताली मोंडकर, राधिका मोंडकर, वैशाली शंकरदास, उदय घाटवळ, उमेश शिरोडकर, विराज आचरेकर, अनुष्का चव्हाण, दिशा गावकर, मनाली गावकर हे यावेळी उपस्थित होते. आम्ही भारावून गेलो आम्ही अंध असल्यामुळे प्रवासाला बाहेर पडताना नातेवाईकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. परंतु आम्ही आमच्या सिक्सेंस मुळे आम्ही सुध्दा सभोवतालचे जग अनुभवतो. सिंधुदुर्ग किल्ला, बोटीचा प्रवास, तेथील समुद्राच्या लाटा काय असतात त्या आम्ही अनुभवल्या. सिंधुदुर्ग किल्ल्याची माहिती आम्हाला तेथील गाईडच्या माध्यमातून मिळाली. समुद्राची भव्यता आणि त्यामध्ये उभा असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची अनुभूती घेवून आम्ही भारावून गेलो आहोत.
समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्याची अंधांनी घेतली अनुभूती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 17:19 IST