सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना गंडा
By Admin | Updated: September 15, 2014 23:13 IST2014-09-15T22:29:32+5:302014-09-15T23:13:03+5:30
तरुणांनी यापासून सावध राहण्याची गरज आहे़ ज्यांना अशा प्रकारची नियुक्तिपत्रे मिळाली आहेत, त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी़

सरकारी नोकरीचे आमिष दाखवून तरुणांना गंडा
प्रवीण पाटील - पणजी -‘नवसंजीवनी मराठी कॉल सेंटर’मध्ये नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक गंडा घालण्याच्या प्रयत्नात असणारे मोठे रॅकेट समोर आले आहे़ महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या संयुक्त उपक्रमातून संजीवनी आरोग्य योजनेअंतर्गत हे कॉल सेंटर सुरू करण्यात आल्याचा बनाव करून या कॉल सेंटरसाठी ‘टेलिफोन आॅपरेटर’ हवे आहेत, अशी जाहिरात फसवेगिरी करणाऱ्यांनी देऊन अनेक तरुणांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला आहे़
अमोल महापुरे (ऐतवडे-खुर्द, जि़ सांगली), अमोल सुरडकर, शरद पवार (पद्मावती, जि़ जालना) या तरुणांना कॉल सेंटरचे नियुक्तिपत्रही दिले आहे़ या तिघांनी दिलेल्या माहितीवरून गोवा आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ़ जुझे. ओ़ ए़ डिसा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारचा कोणताही उपक्रम गोवा सरकार राबवीत नसल्याचे सांगितले़ त्याचप्रमाणे महाराष्ट्र आरोग्य विभागाचे संचालक डॉ़ सतीश पवार यांनाही विचारले असता त्यांनी महाराष्ट्र सरकार असे कोणतेही कॉल सेंटर चालवत नसल्याचे सांगितले़ दरम्यान, या तिघांना या प्रकरणाबाबत विचारले असता फसवेगिरी करणाऱ्या रॅकेटचे कारनामे समोर आले़ अमोल म्हणाला की, २ आॅगस्ट रोजी वृत्तपत्रातील जाहिरात वाचून त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर नाव, पत्ता व शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती पाठवली़ ६ आॅगस्ट रोजी एका महिलेने फोन केला व जनरल नॉलेजवर आधारित दहा प्रश्न विचारले़ त्यानंतर ८ आॅगस्ट रोजी दुसऱ्या क्रमांकावरून पुन्हा फोन करून त्या महिलेने काही प्रश्न विचारले़ प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर ‘काय जॉब आहे? काय करावे लागेल,’ अशी विचारणा केली़ त्यावर तुम्हाला लवकरच आम्ही सर्व माहिती पाठवू, असे सांगण्यात आले़ अमोल सुरडकर व शरद पवार यांनीही अशीच माहिती दिली़
काही दिवसांनी वेगवेगळ्या तारखांना त्या तिघांनाही पोस्टाने रजिस्टर एडी केलेले एक पाकीट आले़ त्यामध्ये महाराष्ट्र आणि गोवा सरकारचा संयुक्त उपक्रम असलेल्या ‘संजीवनी आरोग्य योजना’चे मराठी कॉल सेंटर असे ठसठशीत अक्षरांत लिहिलेले पत्र, संयुक्त सचिव सत्यपाल चौहान व खजिनदार सुनील तावडे नामक व्यक्तींच्या सह्या असलेले नियुक्तिपत्र, नवसंजीवनी मराठी चिकित्सा सेवा (कॉल सेंटर) असे शीर्षक असलेले माहितीपत्र होते़
कॉल सेंटरशी संबंधित महिलेने त्या तिघांना पुन्हा फोन केला व नियुक्तिपत्रावर दिलेल्या मोबाईलवर संपर्क साधून भारतीय स्टेट बँकेचा खाते क्रमांक घेण्यास सांगितले़ त्या खात्यावर महापुरे याला ११ हजार तर अमोल सुरडकर व शरद पवार यांना प्रत्येकी ८ हजार रुपये भरण्यास सांगितले़ ही रक्कम तुम्ही २४ तासांच्या आत भरा, अन्यथा तुमचा अर्ज बाद करण्यात येईल, असे सांगण्यात आले़
सरकारी नोकरी मग पैसे का भरायचे, असा प्रश्न पडलेल्या तिघांनी नियुक्ती पत्रावर दिलेल्या गोव्यातील पत्त्याची चौकशी केली असता पत्ता चुकीचा असल्याचे समजले़
तत्परतेमुळे अमोल महापुरे, अमोल सुरडकर व त्याचा मित्र शरद पवार हे आर्थिक फसवणुकीपासून सावध झाले़ मात्र, या कॉल सेंटरच्या माध्यमातून आणखी किती तरुणांना जाळ्यात ओढले आहे, हे चौकशीअंती समोर येईल़
चुकीचा पत्ता
नियुक्ती पत्रावर एफ-२४७, संजीवनी कॉम्प्लेक्स, ब्लॉक क्रमांक ४९, म्हापसा रोड, पणजी (गोवा) असा पत्ता देण्यात आला आहे़ या पत्त्याच्या चौकशीसाठी म्हापसा पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, तो चुकीचा असल्याचे सांगण्यात आले़ तसेच पालिकेच्या अखत्यारित अशा प्रकारचे ‘संजीवनी कॉम्प्लेक्स’ नसल्याचेही त्यांनी सांगितले़
हा निव्वळ फसवणुकीचा प्रकार आहे़ बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक लुबाडणूक करण्याचा डाव आहे़ ज्या तरुणांना अशा प्रकारचे नियुक्तिपत्र आलेले आहे, त्यांनी जवळच्या पोलीस स्थानकाशी संपर्क साधून तक्रार करावी़ तरुणांनी सहकार्य केल्यास त्याचा लवकरच शोध घेता येईल़
- विश्राम बोरकर, अधीक्षक,
कायदा व दक्षता, गोवा पोलीस
गोवा सरकारकडून अशा प्रकारची कोणतीही योजना अथवा कॉल सेंटर चालविण्यात येत नाही़ तसेच कोणतीही योजना महाराष्ट्र आणि गोवा सरकारच्या संयुक्त उपक्रमातून सुरू केलेली नाही़ बेरोजगार तरुणांची आर्थिक लुबाडणूक करण्याच्या हेतूने हे बोगस पद्धतीने उभे केलेले जाळे आहे़ त्यामुळे तरुणांनी यापासून सावध राहण्याची गरज आहे़ ज्यांना अशा प्रकारची नियुक्तिपत्रे मिळाली आहेत, त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी़
- डॉ़ जुझे़ ओ़ ए़ डिसा, उपसंचालक,
आरोग्य खाते, पणजी
महाराष्ट्र आरोग्य विभागाची ‘संजीवनी आरोग्य योजना’च अस्तित्वात नाही़ तसेच ‘नवसंजीवनी मराठी कॉल सेंटर’ही नाही़ बेरोजगार तरुणांची फसवणूक करण्यासाठी शासनाच्या इतर योजनांशी साधर्म्य असणारे नाव पुढे करून आर्थिक गंडा घालण्याचा हा प्रकार आहे़ तरुणांनी अशा प्रकारच्या कोणत्याही आमिषाला बळी पडू नये़
- डॉ़ सतीश पवार, संचालक,
आरोग्य सेवा संचालनालय, मुंबई
महाराष्ट्र शासनाची ‘नवसंजीवनी आरोग्य योजना’ आहे़ या योजनेच्या माध्यमातून आदिवासी भागातील लोकांसाठी कार्य केले जाते़ मदतकार्यासाठी आम्ही ४०१ ही हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे़ मात्र, नवसंजीवनी मराठी कॉल सेंटर असा कोणताही उपक्रम नाही़
- डॉ़ नंदकुमार देशमुख, आरोग्य अधिकारी, नवसंजीवनी आरोग्य योजना
काय आहे योजना़़़
नियुक्ती पत्रातील माहितीनुसार, ‘संजीवनी आरोग्य योजना’ ही महाराष्ट्र व गोवा सरकारचा संयुक्त उपक्रम आहे़ या योजनेअंतर्गत नवसंजीवनी मराठी कॉल सेंटर सुरू केले आहे़ तसेच राज्य अधिनियम १९९६/७२ बी.आय़पी़टी.अंतर्गत या कॉल सेंटरची नोंदणी असून पिवळे व नारंगी रंगाचे दारिद्र्यरेषेचे कार्ड असणाऱ्या व्यक्तींनाच याचा लाभ घेता येईल़ विशेष म्हणजे १७ हजार ९७५ व्यक्तींनी याचा लाभ घेतल्याची आकडेवारीही दिली आहे़
बोगस मंत्रालय
नियुक्ती पत्राबरोबर योजना काय आहे, कशा पद्धतीने काम करते, तसेच आतापर्यंत किती लोकांना याचा फायदा झालेला आहे, याबाबत माहिती देणारे पत्रक दिले आहे़ या पत्रकाच्या सुरुवातीलाच ‘महाराष्ट्र स्वास्थ्य एवं कल्याण मंत्रालय’ (भारत सरकार) असा उल्लेख असून अशा प्रकारचे मंत्रालयच अस्तित्वात नाही़ याउलट महाराष्ट्र सरकारचे ‘आरोग्य व कुटुंब कल्याण’ असे मंत्रालय आहे़