रॉकेल काळा बाजाराचे ‘स्टिंग आॅपरेशन’

By Admin | Updated: April 23, 2015 00:35 IST2015-04-22T22:59:35+5:302015-04-23T00:35:36+5:30

लोकमतचा दणका

Blackberry's 'Sting Operation' | रॉकेल काळा बाजाराचे ‘स्टिंग आॅपरेशन’

रॉकेल काळा बाजाराचे ‘स्टिंग आॅपरेशन’

चिपळूण : तालुक्यात शिधावाटप दुकानात रॉकेल उपलब्ध नाही, असे सांगून किंवा कमी प्रमाणात रॉकेल ग्राहकाला देऊन उरलेल्या रॉकेलचा काळाबाजार होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले होते. या वृत्ताची बुधवारी तहसीलदार वृषाली पाटील यांनी गंभीर दखल घेतली. निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत यांनी याप्रकरणी रॉकेल घेऊन जाणाऱ्या मुलीमार्फत दुकानदाराची भांडाफोड केली. सोमवारी रात्री शिवाजी चौक येथे एका टँकरमधून खुलेआम रॉकेल काढण्यात येत होते. असे प्रकार सर्रास घडत असल्याने ही बाब ‘लोकमत’ने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तहसीलदार वृषाली पाटील यांनी याप्रकरणी आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी पथके पाठवली. ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या कमी असतानाही टँकरचा क्रमांक घेऊन त्यांनी शोधमोहीम सुरु केली. निवासी नायब तहसीलदार भारतभूषण रजपूत यांना रावतळे भागातून कविता लक्ष्मण चाळके (कार्ड क्र. ५५७) ही रॉकेल घेऊन येताना दिसली. त्यांनी सहज तिच्याकडे चौकशी केली. तिला एक लीटर रॉकेल दिल्याचे तिने सांगितले. दरवेळी आपल्याला एकच लीटर रॉकेल दिले जाते, असे तिने स्पष्ट केले. म्हणून रजपूत यांनी तिची पावती मागितली. या पावतीवर केवळ नाव लिहिलेले होते. रॉकेलचे प्रमाण लिहिलेले नव्हते. ही कोरी पावती घेऊन त्या मुलीसमवेत रजपूत यांनी रेशन दुकानदाराची भेट घेतली आणि चौकशी केली असता मागील महिन्यात या मुलीने एक लीटर रॉकेल नेले होते. परंतु, तिच्या पावतीवर ४ लीटर रॉकेल खतवण्यात आले होते. संबंधित दुकानदाराचा रॉकेलचा कोटा तपासला असता त्यामध्ये तफावत आढळली. मागणीपेक्षाही जास्त रॉकेल येथे आढळून आले.(प्रतिनिधी)


संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे तहसीलदारांनी सांगितले.


रॉकेल घेऊन जाणाऱ्या मुलीमार्फत केली भांडाफोड.


रॉकेल उपलब्ध नाही, असे सांगून किंवा कमी प्रमाणात रॉकेल देऊन काळाबाजार होत असल्याचे वृत्त लोकमतने प्रसिध्द केले.


ज्या मुलीने १ लीटर रॉकेल नेले, तिच्या पावतीवर चार लीटर रॉकेल नेल्याची नोंद.


रॉकेल पुरवठा करणारा टँकर मालक हा शहरातील एका पेट्रोल पंपाचा मालक आहे. रावतळे येथील घटनेनंतर त्याने हे प्रकरण वाढू नयते, यासाठी प्रयत्न सुरु केले होते. परंतु, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी टँकर मालकाला ताकासतुर लागू दिली नाही. त्यामुळे तोही हतबल झाला होता. सर्वच दुकानांची झाडाझडती घेवून सामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Blackberry's 'Sting Operation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.