भाजपचा ‘तो’ निर्णय चुकीचा
By Admin | Updated: November 11, 2014 23:21 IST2014-11-11T22:10:30+5:302014-11-11T23:21:57+5:30
हिंदू जनजागृती समन्वय समितीकडून विरोध

भाजपचा ‘तो’ निर्णय चुकीचा
सावंतवाडी : ‘भगवा दहशतवाद’ असे वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत भाजपने जाण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे आम्ही याला विरोध करीत असल्याचे हिंदू जनजागृतीच्या समन्वय सदस्यांनी सांगितले.
नगरपालिका पत्रकार कक्षात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हेमंत मणेरीकर, दिलीप आठलेकर, एकनाथ सावंत आदी उपस्थित होते. भाजप हा हिंदूंचा पक्ष आहे. शिवसेनेशी फारकत घेतली का? असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले होते. तेच आता भाजपशी जवळीक साधण्याच्या प्रयत्नात आहेत.
त्यामुळे भाजप पक्षाच्या निर्णयाचा आम्ही विरोध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. जगात ख्रिश्चनांची १५७, तर मुस्लीमांची ५२ राष्ट्रे आहेत. मात्र, हिंदूचे एकही राष्ट्र नाही. भारत हा निधर्मी देश बनला आहे. या निधर्मीपणाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन, तर बहुसंख्य हिंदूंवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे हिंदू धर्म जागृती होण्यासाठी ११ नोव्हेंबर रोजी भव्य वाहन फेरी काढण्याचे समितीने ठरविले आहे.
फेरीचा प्रारंभ येथील आत्मेश्वर मंदिरापासून होणार असून शहराच्या विविध भागांमध्ये जाऊन गवळी तिठा येथे या फेरीची सांगता होणार आहे. या फेरीत धर्माभिमानी हिंदूनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता हिंदू धर्मजागृती सभेचे आयोजन येथील कळसूलकर हायस्कूलच्या पटांगणावर करण्यात आले आहे.
या सभेत हिंदूत्वनिष्ठांचे मार्गदर्शन, साधना, राष्ट्र अन् धर्म याविषयीचे ग्रंथप्रदर्शन, हिंदू राष्ट्रस्थापना, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, धर्मशिक्षण आदी विषयांवरही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती हिंदू जनजागृतीच्या सदस्यांनी दिली. (वार्ताहर)