भाजपच्या वरिष्ठांचे लक्ष वेधले
By Admin | Updated: December 1, 2014 00:19 IST2014-11-30T21:36:09+5:302014-12-01T00:19:39+5:30
दक्षिण रत्नागिरी मंडळ वाद : दळवींनी घेतली राजमातांची भेट

भाजपच्या वरिष्ठांचे लक्ष वेधले
सावंतवाडी : दक्षिण रत्नागिरी प्रसारक मंडळातील अंतर्गत वादानंतर माजी आमदार तथा भाजपचे नेते शिवराम दळवी यांनी राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला. मी सदैव राजघराण्याच्या पाठिशी असून घडलेला प्रकार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातला आहे. तेच काय तो निर्णय घेतील, असेही यावेळी दळवींनी सांगितले. राजमातांसोबत त्यांनी एक तास प्रदीर्घ चर्चा ही केली.
दक्षिण रत्नागिरी शिक्षण प्रसारक मंडळातील अंतर्गत वादातून काही सदस्यांनी नवीन नियामक मंडळ काढण्याचा निर्णय घेतला. याप्रकारावरून जनतेत तीव्र नाराजी असून सर्व थरांतून राजघराण्याला पाठिंबा मिळत आहे. माजी आमदार शिवराम दळवी यांनी रविवारी सांयकाळी उशिरा राजमातांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला.
तसेच घडलेल्या प्रकाराची राजमातांकडून माहिती घेतली. यावेळी माजी आमदार दळवी यांनी शनिवारी सायंकाळी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. त्याविषयी राजमातांना माहिती दिली तसेच मंत्री तावडे यांनी याबाबतचा अहवाल मागितला आहे. ते ही लवकरच कारवाईचा निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी दळवी म्हणाले, मी सदैव राजघराण्याच्या सोबत राहिलो आहे. यापुढे ही असाच राहणार आहे. गोरगरीब जनतेचे हे महाविद्यालय असून त्यात सर्वांना शिक्षण मिळते, तेथे राजकारण करणे योग्य नसल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. (वार्ताहर)