कीर्तन महोत्सवाला उदंड प्रतिसाद
By Admin | Updated: January 5, 2015 22:05 IST2015-01-05T21:28:33+5:302015-01-05T22:05:38+5:30
कीर्तन महोत्सवाचे यंदाचे हे दुसरे वर्ष

कीर्तन महोत्सवाला उदंड प्रतिसाद
वेंगुर्ले : भगवंताशी एकरूप होऊन भक्ती केल्यास देव भक्ताच्या हाकेला धावून येतो, असे प्रतिपादन डोंबिवली येथील ह. भ. प. गंगाधरबुवा व्यास यांनी वेेंगुर्ले येथील रामेश्वर मंदिरात सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवावेळी केले.वेंगुर्ले तालुका ब्राह्मण मंडळ, युवा प्रतिष्ठान सिंधुदुर्ग व श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथील श्री देव रामेश्वर मंदिरात भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. कीर्तन महोत्सवाचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून महोत्सवाच्या दिवशी डोंबिवली येथील ह.भ.प. गंगाधार व्यास या अंध बुवांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांनी कीर्तनासाठी ‘कीर्तनी संगीत सौभद्र’ हा विषय घेतला होता. यात अर्जुनाने सुभद्रेच्या प्राप्तीसाठी केलेले नाटक आणि त्याला मिळालेली श्रीकृष्णाची साथ याचे उत्तम सादरीकरण करत त्यांनी सुमारे साडेतीन तास श्रोत्यांना खिळवून ठेवले. बलराम व श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा जेव्हा उपवर होते, तेव्हा बलराम तिचे दुर्योधनाशी लग्न करण्याचे ठरवितो. त्यामुळे सुभद्रेशी लग्न करून इच्छिणारा अर्जुन नाराज होतो. नंतर श्रीकृष्णाच्या सहकार्याने तापसीच्या वेशात द्वारकेत येतो आणि श्रीकृष्णाने सज्ज करून ठेवलेल्या रथात बसून तिला घेऊन जातो. यावरून देव हा भक्ताचा भुकेला असून तो सेवकाचाच दास कसा होतो, असे सुंदर वर्णन व्यास बुवांनी आपल्या कीर्तनातून केले. गंगाधर व्यास यांना हार्मोनियम अमित मेस्त्री, पखवाज नीलेश पेडणेकर, तर तबलासाथ प्रसाद मेस्त्री यांनी केली. (प्रतिनिधी)