डोंगुर्ला तलावावर पक्ष्यांचे संमेलन--लोकमत विशेष

By Admin | Updated: May 29, 2015 23:47 IST2015-05-29T22:29:49+5:302015-05-29T23:47:24+5:30

तीव्र उकाड्यावर उपाय : २0 किलोमीटर परिसरातून हजेरी, ४0 ते ५0 विविध जाती

Bird summit on Donglu lake - Lokmat special | डोंगुर्ला तलावावर पक्ष्यांचे संमेलन--लोकमत विशेष

डोंगुर्ला तलावावर पक्ष्यांचे संमेलन--लोकमत विशेष

संदीप बोडवे -  मालवण-- अंगाची लाही लाही करणाऱ्या आणि तहानेने जीव व्याकूळ करणाऱ्या या प्रचंड उन्हाळ््यात पशु-पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी काही मोजकेच पाणवठे शिल्लक राहिले आहेत. मनुष्य प्राण्याने दुर्लक्षित केलेला मालवण शहराला लागून असलेला पाणी साठा परिसरातील पशु-पक्ष्यांची तहान भागवित आहे. यामुळेच डोंगुर्ला तलाव परिसरात दिवसभर विविध प्रकारच्या पक्षांचे जणू विविधारंगी संमेलन भरल्याचे भासते.
डोंगुर्ला तलावाच्या पाणवठ्यावर २० किलोमीटर परिघातील पशु-पक्षी आपली तहान भागवत आहेत. डोंगुर्ला तलावाच्या परिसरात सकाळच्या रामप्रहरी जर फेरफटका मारला तर निरीक्षकाला ४० ते ५० विविध प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती दिसून येतील. यात छोट्या टिटवीपासून ते मोठ्या आकाराच्या धनेशापर्यंत विविध पक्ष्यांचा वावर दिसून येतो. कित्येक पक्ष्यांनी तर तलाव परिसरातील वनराईत आपले संसार थाटले आहेत.
डोंगुर्ला तलाव परिसरात दिवसभरात कधीही गेलात तरी तुमच्या डोक्यावरून सहजपणे भुर्रकन पाण्यात सूर मारून मासोळी उचलण्याचा प्रयत्न करणारा खंड्या आढळून येतो किंवा खडकावर ध्यान लावून भक्ष्याच्या शोधात बसलेला पाणकावळा हमखास दिसतो. आजुबाजूच्या दलदलीत मान उंच करून सावधपणे फिरताना टिटवी दिसते. शिंजीर किंवा सूर्यपक्षी अगदी क्वचितच शांत बसलेला दिसेल. तो एकतर सतत इकडून तिकडे उडताना दिसेल किंवा सतत वीचीऽऽ वीचीऽऽ चीचीची, वीचीऽऽ असा चिवचिवाट करताना दिसेल. कापशी एखाद्या पर्णहिन झाडाच्या शेंड्यावर बसून पाण्यात उगाचच पाहताना दिसेल. तांबट, निखार, बुलबुल, हळद्या हे पक्षी तळ््याकाठच्या झुडपात आढळतात. तलावाच्या वळणावर नेहमीच आढळणारा रानकोंबडा तर महाचलाख, जरा कुठे काडी मोडली की तो पातेऱ्यावरून सुसाट धाव सुटेल. तळ््यात डुंबणाऱ्या म्हशींच्या पाठीवर धीटपणे बसून परिसराची रखवाली करणारा कोतवालही आवर्जून उपस्थित असतो.
भल्या पहाटेपासून ते दिवस मावळतीला जाईपर्यंत डोंगुर्ला तलाव परिसरात जणू पक्ष्यांचा मेळाच फुललेला असतो. सर्वच भागात पाण्याची पातळी कमालीची घटली असून सर्वच जण आतुरतेने मेघराजाची वाट पाहत आहेत.

पक्ष्यांसाठी जीवनदायिनी
उरले-सुरले पाणवठे सुके पडले
मालवण परिसरात सहजगत्या २० ते २५ हून अधिक प्रकारचे पक्षी आढळून येतात. सध्या उन्हाळी काहिली प्रचंड वाढली आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे शहरानजिकचे उरले सुरले पाणवठे सुके पडले आहेत. कडक उन्हाळ््यामुळे माणसांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
तशीच परिस्थिती पशु- पक्ष्यांचीसुद्धा आहे. मात्र, याला अपवाद आहे तो मालवण शहराला लागून असलेला ऐतिहासिक डोंगुर्ला तलाव.


डोंगर कपारी आणि गर्द झाडींनी वेढलेल्या या तलावात आजही बऱ्यापैकी पाणीसाठा आहे.
चोहोबाजूंनी असलेली वनराई आणि मुबलक पाणी साठ्यामुळे ऐन उन्हाळ््यात डोंगुर्ला तलाव पक्ष्यांसाठी जीवनदायिनीच ठरला आहे.
सकाळच्या वेळात किंवा सायंकाळच्या वेळात हे पक्षी आवर्जून येथे येतात.

Web Title: Bird summit on Donglu lake - Lokmat special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.