कचऱ्याच्या समस्येवर ‘बायोगॅस’चा उतारा!

By Admin | Updated: January 2, 2016 08:29 IST2016-01-01T21:56:27+5:302016-01-02T08:29:20+5:30

रत्नागिरी नगरपरिषद : दीड कोटीच्या प्रकल्पातून बायोगॅसवर वीज निर्मिती होणार...

'Biogas' transcript of the trash problem! | कचऱ्याच्या समस्येवर ‘बायोगॅस’चा उतारा!

कचऱ्याच्या समस्येवर ‘बायोगॅस’चा उतारा!

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी शहरातील कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी पालिकेने नेटाचे प्रयत्न सुरू केले आहेत. पालिकेच्याच जागेत ५ टन ओल्या कचऱ्यापासून दररोज बायोगॅस निर्मिती व त्यातून वीज निर्मितीचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी दीड कोटीचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पामुळे शहरातील कचऱ्याची समस्या कमी होऊन नगरपरिषदेला वीजही उपलब्ध होईल, अशी माहिती नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी ‘लोकमत’ला दिली.
रत्नागिरी पालिका २००० सालापासून कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रयत्नशील आहे. मात्र, अनंत अडथळ्यांच्या शर्यतीत कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प रेंगाळल्याने कचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी वेगवेगळे उपाय सुचविण्यात आले होते. आता रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील ५ गुंठे जागेत हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसवर वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी निविदा पध्दतीने कंत्राटदारांची निवड केली जाणार आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी आवश्यक प्राथमिक तयारी सुरू आहे.
शहरात दररोज जमा होणारा २२ टन कचरा गेल्या काही वर्षांपासून साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्राच्या आवारात टाकला जात होता. त्यामुळे तेथे कचऱ्याचे ढीग तयार झाले होते. या समस्येवर मात करण्यासाठी गेल्याच महिन्यात कोकणनगरमधील चिऱ्यांच्या मोकळ्या खाणींमध्ये शहरातील कचरा टाकला जात आहे. त्यामुळे साळवी स्टॉप परिसरातील लोकांची समस्या संपुष्टात आली आहे.
कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प राबवण्यासाठी पालिकेने दांडेआडोम येथेही जागा घेतली होती. त्या जागेत जाण्यासाठी रस्त्याला जागा देण्यास विरोध झाल्याने काही काळ दांडेआडोमचा विषय रखडला होता. परंतु नंतर जिल्हा प्रशासनाने रस्त्याची जागा उपलब्ध करून दिल्यानंतरही ग्रामस्थ न्यायालयात गेल्याने व त्यांच्या बाजूने निकाल लागल्याने दांडेआडोम प्रकल्पाचा विषय थंडावला आहे.
रत्नागिरीचा विस्तार वाढत चालला आहे. त्यामुळे दररोजचे कचऱ्याचे प्रमाणही वाढत आहे. असे असताना कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्पच उभारणे शक्य न झाल्याने ही समस्या गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका नेमके काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
याबाबत नगराध्यक्ष महेंद्र मयेकर व मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांना विचारले असता, हा बायोगॅस प्रकल्प प्रस्तावित असून, त्याबाबतची प्राथमिक तयारी झाल्याची माहिती त्यांनी दिली. या प्रस्तावित बायोगॅस प्रकल्पाच्या उभारणीतून शहराला बायोगॅसपासून तयार झालेल्या विजेचाही वापर करता येणार आहे. दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्यातून ओला कचरा वेगळा केला जाणार आहे. ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होणार असल्याने कचऱ्याचे ढीग कमी होतील. कचऱ्याची समस्या त्यातून बऱ्याच प्रमाणात सुटणार असल्याचा दावा त्यांनी व्यक्त केला. प्रस्तावित प्रकल्पाकडे नागरिकांचे लक्ष आहे.

महेंद्र मयेकर : दररोज पाच टन कचऱ्यावर होणार प्रक्रिया...
कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून बायोगॅस व त्यापासून वीज निर्मितीच्या या प्रकल्पासाठी जागेचा मुद्दा महत्त्वाचा होता. कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांसाठी शहरात जागा देण्यास विरोध होता. मात्र, आता छोट्या स्वरुपातील या प्रकल्पाला जागेचीही उपलब्धता झाली आहे.
प्रस्तावित बायोगॅस प्रकल्प झाल्यानंतर कचऱ्याची समस्या काही प्रमाणात कमी होणार आहे. मात्र, कचरा संकलित होण्याचे प्रमाण लक्षात घेता शहरात नजीकच्या काळात आणखी काही प्रकल्प नगरपरिषदेला उभारावे लागणार आहेत.

कचरा नष्ट करणार...
शहरातील साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरणच्या आवारात कचरा टाकणे बंद झाले आहे. मात्र, तेथे असलेला कचरा जाळून वा अन्य मार्गाने नष्ट केला जाणार आहे. त्यामुळे साळवी स्टॉप परिसरातील कचऱ्याची समस्या संपेल, असे मुख्याधिकारी एम. बी. खोडके म्हणाले.

Web Title: 'Biogas' transcript of the trash problem!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.