सावंतवाडीत दुचाकी पेटविल्या
By Admin | Updated: October 14, 2014 23:24 IST2014-10-14T21:49:49+5:302014-10-14T23:24:39+5:30
काही काळ वातावरण तंग : पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

सावंतवाडीत दुचाकी पेटविल्या
सावंतवाडी : ऐन विधानसभा निवडणुकीला रंगत चढली असतानाच मंगळवारी पहाटेच्या सुमारास सावंतवाडीत दुचाकी जाळपोळीचा प्रकार घडला आहे. शहरातील खासकिलवाडा भागात पाच तर मुख्य बाजारपेठेनजीक एक अशा सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. यातील पाच दुचाकी खासकिलवाडा भागातील काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब राहत असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये होत्या. या प्रकारामुळे शहरातील वातावरण काहीकाळ तणावग्रस्त झाले होते. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील बंदोबस्त वाढवला होता. या दुचाकी जाळपोळप्रकरणी भार्गवराम शिरोडकर यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. याबाबत पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.ऐन विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी पहाटेच्या सुमारास सावंतवाडी शहरातील विविध भागात दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला. यात सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. यातील एक दुचाकी सारस्वत बँकेनजीक जळून खाक झाली असून ही दुचाकी आनंद आत्माराम जाधव (रा. जिमखाना मैदान, सावंतवाडी) यांच्या मालकीची आहे. यांचे अंदाजे ३० हजारांचे नुकसान झाले आहे. प्रथमदर्शनी ही दुचाकी शॉर्टसर्कीटने जळाली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. त्याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
दुसऱ्या दुचाकी खासकिलवाडा भागात जाळण्यात आल्या आहेत. साईदीपदर्शन इमारतीच्या पार्किंंगमध्ये यातील पाच दुचाकी उभ्या करून ठेवण्यात आल्या होत्या. त्यातील दोन दुचाकी पूर्णत: जळून खाक झाल्या तर इतर तीन गाड्यांचाही काही भाग जळालेल्या स्थितीत आहे. याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात भार्गवराम विठ्ठल शिरोडकर (रा. दीपदर्शन खासकिलवाडा, सावंतवाडी) यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, इमारतीच्या पार्किंगमध्ये लावण्यात आलेली पॅशन प्रो (एम. एच. ०७ आर. ६९५०) ही दुचाकी जाळण्यात आली. त्यांच्याच बाजूला वर्षा वाळके यांची अॅक्टिव्हा (एम. एच. ०७ एम. ७१२७) लावण्यात आली होती. ती जाळून टाकण्यात आली आहे. याशिवाय अन्य तीन दुचाकीही जाळण्यात आल्या.
यामध्ये काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब यांची पत्नी संजना परब यांची नवी अॅक्टिव्हा, दशरथ राऊळ यांची पॅशन प्रो तसेच विशाल शहाजी मेंगळे यांच्या स्प्लेंडर गाडीचाही समावेश आहे.घटनेनंतर परिसरातील सावंतवाडी परिसरात पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. पोलीस दप्तरी दीड लाख रुपये नुकसानीची नोंद झाली असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.या घटनेमुळे पोलीसही चक्रावून गेले आहेत. पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांच्यामते या भागात यापूर्वी पेट्रोल चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यांनीच हे कृत्य केले की अन्य कारणातून ही घटना घडली याचा शोध लवकरात लवकर लावणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्टकेले. (प्रतिनिधी)
जाळपोळीच्या चौकशीची काँग्रेसची मागणी
सावंतवाडी मतदारसंघात निवडणुकीच्या काळातील हा दुसरा प्रकार आहे. आरोंदा येथील संघर्ष समितीच्या अध्यक्षावर झालेला हल्ला आणि त्यानंतर सावंतवाडीत झालेली दुचाकीची जाळपोळ या घटना कोणत्या दहशतवादाला तोंड देणाऱ्या आहेत, याची चौकशी करा. आरोंदा प्रकरणातील आरोपी अद्यापही सापडले नाहीत. या जाळपोळ प्रकरणातील आरोपींना तत्काळ पकडण्याची मागणी काँग्रेस प्रवक्ते जयेंद्र परूळेकर व तालुकाध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली. निवडणुकीच्या प्रचारात जाता येऊ नये याकरिताच हे कृत्य केले असण्याचा संशय परब यांनी व्यक्त केला आहे.