दुचाकी जाळण्याचे प्रकार सुरुच
By Admin | Updated: October 16, 2014 00:06 IST2014-10-15T23:34:53+5:302014-10-16T00:06:20+5:30
अज्ञाताविरोधात गुन्हा : पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

दुचाकी जाळण्याचे प्रकार सुरुच
सावंतवाडी : सावंतवाडी शहरात दुचाकी जाळण्याचे प्रकार सुरूच असून सोमवारी रात्री सहा दुचाकी जाळल्यानंतर मंगळवारी रात्री भाईसाहेब सावंत महाविद्यालयातील अमित रमेश ओहळ (वय २३, रा. पुणे) या विद्यार्थ्याची गाडी अज्ञाताने जाळली. या सर्व प्रकारामागे कोणाचा हात आहे, याचा छडा लावण्यात अद्याप पोलीस यंत्रणेला यश आलेले नाही. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुुन्हा दाखल केला आहे.
अमित ओहळ हा पुणे येथील असून येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे. येथील साधले मेससमोरील ‘वाळके निवास’ या इमारतीत तो राहतो. नेहमीप्रमाणे त्याने आपली बजाज प्लॅटिना (एमएच४० एच ८२११) ही दुचाकी वाळके निवास इमारतीच्यासमोर उभी करून ठेवली होती. बुधवारी पहाटेच्यावेळी अज्ञाताने या दुचाकीला आग लावली. यात दुचाकी पूर्णत: खाक होऊन सुमारे ४० हजाराचे नुकसान झाल्याचे अमितने पोलीस तक्रारीत म्हटले आहे. आग लावणारी अज्ञात व्यक्ती मोटारसायकलवरून आल्याचेही त्याने म्हटले आहे.
दरम्यान, सोमवारी रात्रीही खासकीलवाडा परिसरातील सहा दुचाकी जाळण्यात आल्या होत्या. त्यानंतर बुधवारी मतदानाच्या दिवशीही आणखी एक दुचाकी जाळण्याची घटना समोर आली आहे. दशरथ राऊळ, भार्गवराम शिरोडकर, विशाल डोंगळे, वर्षा वाळके यांच्या गाड्यांसोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजू परब यांची पत्नी संजना परब यांच्याही दुचाकीचा यात समावेश असल्याने या घटनेला राजकीय वळण लागले होते. मात्र, बुधवारी पहाटे एका महाविद्यालयीन युवकाची दुचाकी जाळल्याने यामागील सूत्रधार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत सावंतवाडी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, यामागील सूत्रधार शोधण्यात अद्याप यश आले नाही. (वार्ताहर)