भास्कर जाधवांविरुद्ध अपक्ष लढणार

By Admin | Updated: August 17, 2014 00:21 IST2014-08-17T00:20:41+5:302014-08-17T00:21:20+5:30

नीलेश राणे : जाधव यांची वृत्ती विकासाला मारक

Bhaskar will fight against Jadhav | भास्कर जाधवांविरुद्ध अपक्ष लढणार

भास्कर जाधवांविरुद्ध अपक्ष लढणार

गुहागर : रत्नागिरीपासून सिंधुदुर्गपर्यंत लोकसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांनी आतल्या गाठीचे राजकारण केले. आपल्या पराभवाला अप्रत्यक्षपणे जाधव जबाबदार आहेत, याचा राग आपल्या मनात आहे. ही लढाई कोणत्याही पक्षाविरोधात नसून एका व्यक्तीविरोधात आहे. म्हणूनच आपण गुहागर मतदारसंघातून अपक्ष विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची जाहीर घोषणा माजी खासदार नीलेश राणे यांनी गुहागर विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केली. याबाबत आपण आपले वडील उद्योगमंत्री नारायण राणे यांना कोणतीही कल्पना दिलेली नसल्याचेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर कामाची सुरुवात कुठून करायची, हा प्रश्न आपल्यासमोर होता. पराभव झाल्यानंतर भास्कर जाधव यांच्याबद्दल मनात राग होता. नारायण राणे प्रचारप्रमुख झाले. मनात आणले असते तर सिंधुदुर्गातून उभे राहता आले असते; पण राणे यांना याबाबत काहीही न सांगता गुहागर मतदारसंघातून अपक्ष उभा राहण्याचा निर्णय आपण घेतला आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी असली तरी अनेक उमेदवार इच्छुक असू शकतात. गुहागरची जागा काँग्रेसला सोडली जाणार नाही. तसा निर्णय झाला तरी गुहागरमधील काँग्रेसचे अनेकजण इच्छुक असतील. या कोणावरही आपल्यामुळे अन्याय होऊ नये यासाठी अपक्षच उभे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भास्कर जाधव यांचे नुकसान करणे हा एकमेव उद्देश आहे. गुहागर मतदारसंघात जाधव यांनी दर्जाहीन कामे केली आहेत. दादागिरी करून जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वेठीस धरणे ही त्यांची प्रवृत्ती आहे. जनतेचे काम न करणाऱ्याला धडा आपण शिकविणार आहोत. लोकसभा निवडणुकीत आपल्या पराभवाला भास्कर जाधव प्रत्यक्षपणे कारणीभूत नसले तरी दीपक केसरकर यांना त्यांनीच खतपाणी घातले, असे ते म्हणाले.
आपण आघाडीचा उमेदवार होतो. भास्कर जाधव याच जिल्ह्यातील असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते. तरीही आपल्या एकाही प्रचारसभेला ते जाणीवपूर्वक आले नाहीत. उमेदवार म्हणून त्यांना निमंत्रण द्यायला हवे होते काय? असा सवालही त्यांनी केला. आपल्याला रत्नागिरीतून काम करण्याची इच्छा आहे. आपल्यासाठी लांजा, राजापूर हे सुरक्षित मतदारसंघ आहेत; परंतु आपण भास्कर जाधव यांच्यासमोरच उभे राहणार आहोत. जाधव यांची वृत्ती कोकणच्या विकासाला मारक आहे. आम्ही पाठीमागून राजकारण करीत नाही. समोरासमोर जाहीरपणे लढतो, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)
गुहागर विश्रामगृह येथे प्रमुख काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली व आपला निर्णय नीलेश राणे यांनी जाहीर केला. यावेळी तालुकाध्यक्ष अब्बास कारभारी, रामदास राणे, चंद्रकांत बाईत, आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शृंगारतळी येथेही नीलेश राणे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी व्यापारी नासीम मालाणी यांची भेट घेतल्याचे सुशील वेल्हाळ यांनी सांगितले.

Web Title: Bhaskar will fight against Jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.