कबड्डी स्पर्धेत भगवती देवली संघ विजेता

By Admin | Updated: December 2, 2014 00:28 IST2014-12-01T21:47:31+5:302014-12-02T00:28:04+5:30

आस्था ग्रुपचे आयोजन : उत्कृष्ट पकड मंदार धुरी, उत्कृष्ट चढाई नवनीत चव्हाण यांची निवड

Bhagwati Devli Sangh winners in Kabaddi competition | कबड्डी स्पर्धेत भगवती देवली संघ विजेता

कबड्डी स्पर्धेत भगवती देवली संघ विजेता

मालवण : नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग आणि येथील आस्था ग्रुपतर्फे युवक क्रीडा मंडळाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय खुली पुरुष गट कबड्डी स्पर्धेत भगवती देवली संघाने अतितटीच्या आणि रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात देवबाग संघाचा अवघ्या दोन गुणांनी निसटता पराभव करून विजेतेपद पटकावले. उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक मंदार धुरी (देवबाग) आणि उत्कृष्ट चढाईचे पारितोषिक नवनीत चव्हाण (देवली) यांना देण्यात आले. या खेळाडूंना प्रत्येकी ५०१ रुपये देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ कबड्डीपटू रामभाऊ पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नेहरू युवा केंद्राचे समन्वयक राकेश पेडणेकर, मिनल टिकम, माजी नगरसेवक उत्तम पेडणेकर, महेश गिरकर, नितीन हडकर, प्रशांत मयेकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
शनिवारी रात्री बंदरजेटी येथे ही स्पर्धा घेण्यात आली. यात तालुक्यातील १६ संघांनी सहभाग घेतला होता. विजेत्यांना अनुक्रमे रुपये ३००१, २००१ व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच उत्तेजनार्थ म्हणून टोपीवाला ज्युनिअर कॉलेज संघाला ५०१ रुपये, चषक देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच उदयोन्मुख खेळाडू म्हणून कुलराज उमेश बांदेकर याला रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी संघांना सन्मानपत्र देण्यात आले. उपांत्यफेरीच्या लढतीत जय गणेश संघ आणि टोपीवाला ज्युनिअर कॉलेज संघ पराभूत झाले होते. अंतिम सामन्यात देवली संघावर देवबाग संघाने दबाव टाकला होता. मात्र मध्यंतरानंतर देवली संघाने आक्रमकपणे चढाया व संरक्षण करत आपल्या संघाला विजयी केले. देवली संघातर्फे नवनीत चव्हाण, उदय चव्हाण, विकास चव्हाण, अजित चव्हाण, तेजस गोसावी, कृष्णा चव्हाण, राजाराम चव्हाण यांनी चांगला खेळ केला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण रामभाऊ पेडणेकर व आस्था ग्रुपचे अध्यक्ष हरी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सूर्यकांत फणसेकर, बंटी केनवडेकर, उमेश मांजरेकर, भाऊ सामंत, प्रशांत बिरमोळे, उत्तम पेडणेकर, बाबाजी बांदेकर, मिथिलेश मिठबांवकर, आंतोन फर्नांडिस, महेश गिरकर, नितीन हडकर, जेरी फर्नांडिस, रवी मिटकर, मनोज चव्हाण तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन सौगंधराज बांदेकर यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Bhagwati Devli Sangh winners in Kabaddi competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.