स्वयंरोजगारासाठी उत्तम पर्याय
By Admin | Updated: July 25, 2014 22:54 IST2014-07-25T22:22:44+5:302014-07-25T22:54:04+5:30
पोल्ट्री व्यावसायिकांसाठी अनुदान : पशुसंवर्धन खात्याचा विशेष कार्यक्रम

स्वयंरोजगारासाठी उत्तम पर्याय
रहिम दलाल- रत्नागिरी
जिल्ह्यात पोल्ट्री व्यवसायाला चालना मिळून स्वयंरोजगार निर्माण व्हावा, यासाठी परिसरातील कुक्कुटपालन व्यवसायाला चालना देणे, या योजनेअंतर्गत जिल्ह्यात ९०० लोकांना पक्षी वाटप करण्यात येणार असून, खुराड्यांसाठीही साडेतेरा लाख रुपये देण्यात येणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यात शेळी पालनासह कुक्कुट पालनातूनही मोठ्या प्रमाणात स्वयंरोजगार निर्मिती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने पावले उचलली आहेत. त्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या परसातील कुक्कुटपालन चालना देणे या योजनेचा आधार घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मांसाहार करण्यात येत असल्याने शेळ्या, कोंबड्यांचा मोठा व्यवसाय सुरु आहे. त्यासाठी हे व्यावसायिक परजिल्ह्यावरच अवलंबून अजूनपर्यंत अवलंबून आहेत. मात्र, गेल्यावर्षी शेळीपालन या व्यवसायाला चालना देण्यासाठी १५० लाभार्थींना शेळीवाटप करण्यात आले होते. पशुसंवर्धन विभागाने राबविलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेकजण पुढे येत आहेत.
ग्रामीण भागातील अनेकजण आजही मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये रोजगारासाठी जात असताना त्यांच्यासाठी गावातच स्वयंरोजगार निर्माण झाल्यास शेतीला हा जोडधंदा पुढे येईल. त्यासाठी शेळीपालनासह आता कुक्कुट पालनाही चालना देण्यात येत आहे. परसातील कुक्कुटपालन चालना देणे या योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभागाने जिल्हाभरातून प्रस्ताव मागविले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून ९०० लोकांचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत.
या प्रत्येक लाभार्थीला ४५ पक्षी देण्यात येणार आहेत. तसेच कोंबड्यांना खुराड्याची सोय व्हावी, यासाठी प्रत्येक लाभार्थीला १५०० रुपये असे एकूण साडेतेरा लाख रुपये या लाभार्थींच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ९०० लोक स्वत:च्या पायावर उभे राहण्यास यामुळे मदत होणार आहे.
जिल्ह्यात दुग्ध व्यवसायासह शेळीपालन, कुक्कुटपालन या व्यवसायाला मोठी संधी आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या योजना ग्रामीण भागातील अगदी खेड्यापाड्यात राबवून स्वयंरोजगार निर्मितीवर भर देण्यासाठी ही धडपड सुरु आहे. आज जिल्ह्यात ३००० लीटर्सपर्यंत प्रतिदिन दुधाचे उत्पादन सुरु झाले आहे. त्यातच कुक्कुट पालनातून वर्षभरातच पोल्ट्री व्यवसातून स्वयंरोजगार निर्मिती होणार आहे. त्यातून अनेक कुटुंब स्वत:च्या पायावर उभी राहणार आहेत.
- डॉ. एस. सी. म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद