विश्वास खरे खून, दोघे पुण्यात ताब्यात
By Admin | Updated: January 7, 2015 23:59 IST2015-01-07T22:15:42+5:302015-01-07T23:59:29+5:30
याप्रकरणात नेमका कोणाचा हात आहे, सुपारी देण्याचा तर हा प्रकार नाही ना, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळावयाची आहेत.

विश्वास खरे खून, दोघे पुण्यात ताब्यात
रत्नागिरी/गुहागर : गुहागरमधील कासवमित्र विश्वास खरे खूनप्रकरणाचे धागेदोरे सापडल्यानंतर आज पुणे येथे दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. संशयितांना ताब्यात घेतल्याने या खूनप्रकरणातील सत्य बाहेर पडण्यास मोठी मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवारी ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी दोन पर्यटक वरचा पाट येथे विश्वास खरे यांच्या खरे प्लेझर पॉर्इंट येथे रहाण्यासाठी आले. सायंकाळी ६.३० वा. खरे यांचा मोठा भाऊ विवेक व पुतण्या सचिन यांना विश्वास खरे याचे खरे प्लेझर पॉर्इंट कुठे याची विचारणा केली. नेहमीप्रमाणे पर्यटक आहेत, असे समजून त्यांना राहण्यासाठी खोली देण्यात आली. रात्रभर या दोघांनी समुद्रकिनारी माडाच्या बनात असलेल्या खोलीमध्ये मुक्काम ठोकला. सकाळी ६.३० वा. विश्वास खरे यांच्या पत्नी या पर्यटकांसाठी चहा घेऊन गेल्या. त्यानंतर आॅर्डरनुसार सकाळी ९.३० वा. कांदापोहे देण्यासाठी गेल्या. यावेळी खरे तेथेच होते व वातावरण नेहमीसारखेच होते. यानंतर दोन तास होऊन गेले तरी खरे का आले नाहीत हे पाहण्यासाठी त्यांच्या पत्नी पर्यटकांच्या खोलीकडे आल्या. खरेंचा आजूबाजूला शोध घेऊनही पत्ता न लागल्याने त्यांनी आपले दीर विवेक खरे यांना बोलावून आणले. त्यांनी कीचन शेडच्या दरवाजावरील कुलून तोडले. त्यावेळी विश्वास खरे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याचे त्यांना दिसले. तपास सुरू असताना पोलिसांना खरे यांचा मोबाईल सापडला नाही. त्यामुळे शोध घेण्याचा प्रयत्न केला असता खरे यांचा गायब झालेला मोबाईल ५ किलोमीटर्सच्या अंतरावर असल्याचे सिग्नल्स मिळत होते. त्यानंतर पुन्हा टॉवर टेस्टमध्ये घरापासून जवळच्या अंतरावर मोबाईलचे ठिकाण दिसून येत होते. त्यामुळे याप्रकरणात नेमका कोणाचा हात आहे, सुपारी देण्याचा तर हा प्रकार नाही ना, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळावयाची आहेत. (प्रतिनिधी)