सजग राहणे ही अधोरेखित केलेली बाब
By Admin | Updated: March 23, 2015 00:39 IST2015-03-22T22:23:17+5:302015-03-23T00:39:42+5:30
गोपाळ दुखंडे : वेगुर्ले येथील ‘विचार जागर कार्यक्रमात पानसरेंना आदरांजली

सजग राहणे ही अधोरेखित केलेली बाब
वेंगुर्ले : भारतीय घटनेने आपल्याला दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच कोणालाही कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही. यादृष्टीने सजग राहणे ही वर्तमानकाळाने अधोरेखित केलेली तातडीची बाब आहे. या देशातील सुबुद्ध नागरिकांनी त्याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ समाजवादी नेते गोपाळ दुखंंडे यांनी येथे व्यक्त केले. तालुक्यातील विविध संस्थांच्यावतीने कॉ. गोविंद पानसरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘विचार जागर’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्र सेवा दलाच्या अध्यक्षा मंगल परूळेकर, किरात ट्रस्टचे अॅड. शशांक मराठे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अॅड. देवदत्त परूळेकर, राष्ट्रभाषा हिंदी प्रचार सभेचे वीरधवल परब, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी दुखंडे म्हणाले, गोविंद पानसरे यांनी नेहमीच वंचितांच्या आणि कष्टकऱ्यांच्या बरोबर राहून त्यांना अपेक्षित न्याय मिळावा, यासाठी सनदशीर मार्गाने व्यापक लढा उभारला. असे लढे उभारताना भारतीय लोकशाही मूल्य व्यवस्थेची कोणत्याही परिस्थितीत जपणूक केली पाहिजे, हे त्यांनी वेळोवेळी आपल्या कृती आणि लेखनातून स्पष्ट केले. आज त्यांच्या स्मृती जागवताना प्रत्येक भारतीय नारिकाने आपल्या घटनादत्त अधिकार व कर्तव्यांबाबत दक्ष असणे जरूरीचे झाले आहे, असे वाटते. सध्याचा काळ त्यादृष्टीने अतिशय आव्हानात्मक आहे. हे आव्हान आपण स्वीकारले पाहिजे. मात्र, यासंदर्भात बुद्धजीवी वर्गात असलेली सर्व पातळ्यांवरची उदासीनता आणि आत्मकेंद्रित वृत्ती ही चिंतेची बाब आहे.प्रबोधनाच्या वाटेने जाऊन चळवळीतील कार्यकर्त्यांनी ही मरगळ झटकून टाकल्यास कॉ. पानसरे यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिल्याचे समाधान मिळू शकेल, असे विचार मांडले. यावेळी कॉ. पानसरे यांच्या हत्येनंतर राज्यभरातील नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या निवडक पानसरे यांच्याविषयीच्या कवितांचे वाचन रघुवीर परब, अरुण नाईक, सुनील जाधव, प्रा. ए. डी. सुतार, प्रा. प्रकाश देसाई, मंगल परूळेकर यांनी केले. यामध्ये स्मशान शांततेची शिकवण, प्रिय कॉम्रेड तुम्ही चुकलाच!, तू माझ्या बापाच्या अंत्ययात्रेस होतास, आदी कवितांचा समावेश होता. त्यानंतर कॉ. पानसरे यांच्या विविध माध्यमामध्ये याआधी प्रक्षेपित झालेल्या मुलाखतीचे दृक्श्राव्य रूपांतरण सादर करण्यात आले. कार्यक्रमाला एम. पी. मेस्त्री, जयश्री सामंत, भरत आवळे, अॅड. संदीप निंबाळकर, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक देवदत्त परूळेकर, तर प्रा. सुनील भिसे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्तांगण परिवाराने परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)