आतंकवाद्यांचे हल्ले रोखण्यासाठी सतर्क रहावे
By Admin | Updated: July 29, 2014 23:00 IST2014-07-29T22:04:31+5:302014-07-29T23:00:01+5:30
संचित कौशिक : देवगडमध्ये सागरी सुरक्षा अभियानाअंतर्गत मार्गदर्शन

आतंकवाद्यांचे हल्ले रोखण्यासाठी सतर्क रहावे
जामसंडे : देशावर होणारे आतंकवाद्यांचे हल्ले रोखण्यासाठी मच्छिमारांनी सतर्क रहावे, असे प्रतिपादन नेव्हीचे लेफ्टनंट संचित कौशिक यांनी देवगडमध्ये बोलताना केले. देवगडमध्ये मंगळवारी सागरी सुरक्षा मार्गदर्शन शिबिरांतर्गत त्यांनी देवगडमधील मच्छिमारांना मार्गदर्शन केले.
लेफ्टनंट कौशिक म्हणाले, देशामध्ये शिरण्यासाठी आतंकवाद्यांकडे सागरी मार्गाचा सुरक्षित पर्याय असल्याने त्यामार्गे भारतात शिरकाव करून देशात आतंकी कारवाया करण्यासाठी आतंकवादी प्रयत्नशील असतात. मात्र मच्छिमार सतर्क राहून अशा आतंकवाद्यांपासून आपल्या देशाला वाचवू शकतो. मच्छिमारांनी आपापल्या गावात अनोळखी व्यक्ती, बोट, ट्रॉलर आलेले आढळल्यास त्वरित पोलीस, सरपंच किंवा तटरक्षक दलाशी संपर्क साधावा. समुद्रामध्ये संशयास्पद हालचाली आढळल्यासही त्यांनी या यंत्रणेशी संपर्क साधावा. अनोळखी व्यक्तीला आपली नौका भाड्याने देऊ नये किंवा विकू नये. पावसाळ््यात मच्छिमारी टाळावी. मच्छिमारीसाठी समुद्रात जाताना आवश्यक ते सर्व कागदपत्र, ओळखपत्र घेऊन मच्छिमारीसाठी जावे. आपणास संशयास्पद जाणवलेली लहानात लहान माहितीही शासकीय यंत्रणेला द्यावी, असेही लेफ्टनंट कौशिक यांनी यावेळी सांगितले.
तटरक्षक दलाचे अधिकारी आर. एस. उपाध्याय म्हणाले, गावामध्ये अनोळखी व्यक्तींना आपले घर भाड्याने देताना स्थानिक पोलिसांना त्याची कल्पना द्यावी. मुंबईवरील आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ला अगोदर त्यांनी मुंबईत समुद्रामार्गे प्रवेश केला होता. त्यांनी प्रवेश करताना समुद्रामध्ये एक मच्छिमारी नौका जबरदस्तीने ताब्यात घेतली. त्यातील चौघांना तत्काळ ठार मारले. तर दोघांना मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर येताच ठार मारले. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रामध्ये कोणत्याही अनोळखी नौकेने जवळ बोलावल्यास त्यांच्याजवळ जाऊ नये. कस्टमचे निरीक्षक सुनील बेस्ट यांनी समुद्रातील सुरक्षा मजबूत होणे देशाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. मच्छिमारांच्या मदतीशिवाय आतंकवादी हल्ले रोखता येणार नाहीत, असे सांगितले. यावेळी या अधिकाऱ्यांना आपल्या अडचणी सांगताना उपस्थित मच्छिमारांनी आपल्या समुद्रामध्ये परराज्यातील मच्छिमार २५ नौकांच्या समुहानी एकत्रितरित्या येऊन मच्छिमारी करतात. त्यांच्याजवळ आपल्याकडील नौका गेली तर ते त्या नौकेवरील खलाशांना मारहाण करतात. या नौकांवर कोणतेही नाव नसते. या नौका चालकांकडे कोणतेही परवाने नसतात असे सांगितले. तसेच अशा नौकांच्या समुद्रातून एखादी आतंकवाद्यांची नौका आपल्या देशाच्या हद्दीत शिरली तर आपण त्यांना कसे ओळखावे? असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी सागरी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र साळुंके, तारामुंबरी सोसायटीचे अध्यक्ष दुर्गाप्रसाद पराडकर, देवगड मच्छिमार सोसायटी अध्यक्ष संजय बांदेकर, मच्छिमार भाई खोबरेकर, महिला पोलीस उपनिरीक्षक माधवी पाटे, नेव्हीचे अधिकारी एम. के. पांडे, संजय कुमार, कस्टम अधिकारी अमिताभ गौतम आदी उपस्थित होते. (वार्ताहर)