राणेंसाठी प्रतिष्ठेची लढाई

By Admin | Updated: September 22, 2014 01:00 IST2014-09-22T00:58:38+5:302014-09-22T01:00:29+5:30

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत लढती होणार चुरशीच्या

Battle of prestige for the Ranen | राणेंसाठी प्रतिष्ठेची लढाई

राणेंसाठी प्रतिष्ठेची लढाई

महेश सरनाईक ल्ल कणकवली
विधानसभा निवडणूक आता अवघ्या २५ दिवसांवर येऊन ठेपली असली तरी अजूनही कोण कोणाच्या विरोधात लढणार याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. कारण राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडीतील बिघाडी अजून कायम आहे, तर शिवसेना - भाजपमध्ये युतीबाबतचा तिढाही कायम आहे. येत्या दोन ते तीन दिवसात याबाबतचे चित्र स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, विचित्र अवस्थेमुळे सर्वच पक्ष जर एकमेकांविरोधात लढले तर प्रत्येक मतदारसंघातील लढत अत्यंत चुरशीची होणार आहे. ही निवडणूक नारायण राणे यांच्यासाठी मात्र प्रतिष्ठेची लढाई आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. गतनिवडणुकीत कणकवली - देवगड - वैभववाडी या मतदारसंघात भाजपाचे आमदार प्रमोद जठार, कुडाळ-मालवणमधून उद्योगमंत्री नारायण राणे, तर सावंतवाडी - वेंगुर्ले - दोडामार्ग या मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर प्रतिनिधित्त्व करत होते. यात महिनाभरापूर्वी आमदार दीपक केसरकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
या तिन्ही मतदारसंघात विद्यमान आमदार पुन्हा एकदा तिन्ही ठिकाणी आपले नशीब आजमावणार आहेत. त्यात सर्वाधिक कसोटी आहे ती राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांची. कारण नारायण राणे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार नीलेश राणे यांचा रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात दारूण पराभव झाला होता. त्यामुळे आता कुडाळ-मालवण मतदारसंघातून आपण निवडून येतानाच कणकवली मतदारसंघातून सुपुत्र नितेश राणे यांना निवडून आणण्याचीही जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्याचबरोबर नारायण राणे हे काँग्रेसच्या प्रचारसमितीचे प्रमुख आहेत. त्यामुळे राज्यातील काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारीही राणेंकडेच असेल. त्यामुळे या सर्व जबाबदाऱ्या ते कसे पेलतात, याकडे सर्र्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
काँग्रेसने आता नव्याने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर दिली आहे. ते आता कशा पद्धतीने प्रचाराचा धुरळा उडवतात, यावर विजयाची गणिते अवलंबून असणार आहेत. निवडणुकीसाठी प्रत्यक्षात आता २५ दिवस शिल्लक आहेत. मात्र, अद्याप काँग्रेस आघाडी किंवा शिवसेना-भाजप युतीबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे सध्या दोन्ही पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यामुळे युती किंवा आघाडी झाली नाही आणि चौरंगी लढती झाल्या, तर मात्र सत्ताधारी काँग्रेसच्यादृष्टीने ते सोपे होणार आहे.
तिन्ही मतदारसंघात सध्या नारायण राणे सोडून दोन्ही विद्यमान आमदारांनी म्हणजे प्रमोद जठार आणि दीपक केसरकर यांनी प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. गतवेळचे पराभूत व शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी मालवण, कुडाळ तालुक्यातच घरोघरी गाठीभेटींवर जोर दिला आहे. कणकवली मतदारसंघात काँग्रेसकडून नितेश राणे यांनी गाठीभेटी आणि कॉर्नर बैठकांमधून प्रचाराला सुरूवात केली आहे. सावंतवाडी मतदारसंघात केसरकर यांच्याविरोधात मनसेकडून परशुराम उपरकर आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांनीही रिंगणात उतरण्यासाठी फिल्डिंग लावली आहे.

Web Title: Battle of prestige for the Ranen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.