मातीच्या पिशव्यांचा आधार
By Admin | Updated: August 3, 2014 22:47 IST2014-08-03T22:09:11+5:302014-08-03T22:47:44+5:30
भविष्यात संकट : गोव्याच्या हद्दीवरील डाव्या कालव्याला भगदाड

मातीच्या पिशव्यांचा आधार
वैभव साळकर-दोडामार्ग , तिलारी प्रकल्पाचे गोव्यात पाणी वाहून नेणारे महाराष्ट्र हद्दीतील कालवे निकृष्ट असल्याचा आरोप वारंवार गोवा राज्याकडून होत असताना हे कालवा निकृष्टीचे ग्रहण गोव्यातील कालव्यांना लागल्याचा प्रकारही उघडकीस आला आहे. महाराष्ट्र-गोवा हदद्दीवर असलेल्या मुख्य डाव्या कालव्याला भेगा गेल्या असून त्याला चक्क पिशव्यांमध्ये माती भरून आधार देण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात कालवा फुटीचे संकट निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या तिलारी धरणाचे पाणी गोव्यात नेण्यासाठी प्रकल्पस्थळापासून उजवा आणि डावा असे दोन कालवे खोदण्यात आले आहेत. त्यापैकी मुख्य धरणाचे पाणी डाव्या कालव्याबाहेर तर उन्नेयी बंधाऱ्याचे पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडले जाते. डावा कालवा महाराष्ट्र-गोवा हद्दीवर बिचोली तालुक्यात प्रवेश करतो. या कालव्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे.
महाराष्ट्र हद्दीत अनेक ठिकाणी कालवा फुटण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हद्दीतील कालव्यांच्या कामाबाबत गोवा राज्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गोव्याचे जलसंपदामंत्री दयानंद मांद्रेकर यांनीही गतवर्षी कालव्यांची पाहणी केली होती. त्यामुळे तिलारीचे कालवे एक चर्चेचा विषय बनला होता. मात्र, आता असाच प्रकार गोवा हद्दीतही पहावयास मिळतो आहे.
कालव्याच्या वरच्याबाजूने डोंगर असून या डोंगराचे पाणी पावसाळ्यात खाली वाहून येते. त्याचा निचरा होण्यासाठी कालव्याखालून मोरी बांधणे आवश्यक होते. परंतु तसे न करता त्याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यात आली. हे पाणी सातत्याने त्या ठिकाणी आतमध्ये झिरपू लागल्यानेच कालव्याला भेगा पडल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.