सहा यंत्रांवर आधारचा भार
By Admin | Updated: July 6, 2015 00:24 IST2015-07-05T21:37:10+5:302015-07-06T00:24:31+5:30
राजापूर तालुका : ७० टक्के जनता आधारपासून वंचित

सहा यंत्रांवर आधारचा भार
राजापूर : प्रशासनाचा ढीम्मपणा, लोकप्रतिनिधी आणि ठेकेदाराची उदासिनता यामुळे राजापूर तालुक्यातील सुमारे ७० टक्के जनता म्हणजेच १ लाख १४ हजार १ जनता आधार कार्डपासून वंचित राहिली आहे. सध्या प्रशासकीय पातळीवर रेशनिंंगकार्ड आधार कार्डाशी संलग्न करण्याची मोहीम सुरु असली तरी या मोहिमेमध्ये आधारकार्डमुळेच अडचणी निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे राजापूर तालुक्यासाठी एकूण सहा आधार कार्ड मशिन देण्यात आल्या असल्या तरी त्या बंद स्थितीत असल्याने लोकांना आता आधार मिळणेच कठीण बनले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शासनाकडून बँक खाते, गॅस कार्ड, निवडणूक ओळखपत्र व आता रेशनिंंग कार्ड आधारकार्डशी संलग्न करण्याचा धडाका सुरु करण्यात आला आहे. आधारकार्ड नसल्यामुळे सर्वसामान्य लोकांना अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे. निवडणूक ओळखपत्राप्रमाणे आधारकार्ड काढून देण्याची व्यवस्था शासकीय पातळीवरुन करण्यात आली. मात्र, ठेकेदाराचा गलथानपणा, प्रशासनाचा ढीम्मपणा व लोकप्रतिनिधीची उदासीनता यामुळे आजही तालुक्यातील बहुतांश जनता आधार कार्डापासून वंचित आहे.
आता शासनाच्या आदेशानुसार रेशन कार्डशी आधारकार्ड संलग्न करण्यासाठी आधारकार्डाची नितांत आवश्यकता आहे. राजापूर तालुक्यात एकही आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरु नसल्याने शहरासह ग्रामीण भागातील जनतेला आर्र्थिक भुर्दंड सोसून रत्नागिरी किंंवा लांजा या ठिकाणी रांगा लावाव्या लागत आहेत. राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागात आधारचा बोजवारा उडाला असून शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच आधार यंत्रणेत बिघाड झाल्याने व केवळ सहा मशिन्सवर हे काम सुरू असल्याने त्याबाबत आता कोणती कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे. ही यंत्रणा लवकर पूर्ववत व्हावी अशी मागणी आहे.(प्रतिनिधी)
मशिनची अनुपलब्धता
सहा वर्षांपासून पुढे सर्वच मुलांसह सर्वांचेच आधारकार्ड काढण्याचे आदेश शासन स्तरावरुन देण्यात आले असले तरी राजापूर तालुक्यात लहान मुलांचे आधारकार्ड नोंदणी मशिन उपलब्ध नसल्यामुळे अनेक लहानग्यांनाही आधार कार्डापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शासकीय स्तरावरुन खास लहान मुलांसाठी स्वतंत्र आधार कार्ड नोंदणी कॅम्प घेण्याची मागणी संपूर्ण तालुकाभरातून करण्यात येत आहे.
आधारकार्डचे वाटप महत्त्वाचे
राजापूर तालुक्यातील २३७ महसुली गावांची एकूण लोकसंख्या एक लाख ६५ हजार ८७५ एवढी आहे. यापैकी ३० जूनअखेर केवळ ६४ हजार ४७४ लोकांची आधारकार्ड नोदणी झालेली आहे. अद्यापही तालुक्यातील १ लाख १४ हजार १ लोकांना आधार कार्ड मिळालेली नाहीत व आता त्यांनी नोदणी करावी, असे एकही आधारकार्ड नोंदणी केंद्र संपूर्ण तालुकाभरात सुरु नाही.
राजापूर तालुक्यात लवकरात लवकर आधार कार्ड मिळण्यासाठी शासनाकडून प्रत्येक जिल्हा परिषद विभागात आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरु करावे, अशी मागणी तालुक्यातील आमजनतेतून करण्यात येत आहे. मात्र, याबाबत प्रशासन ढिम्म असून, लोकप्रतिनिधींना याबाबत काहीही देणे-घेणे नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परिणामी सध्या राजापुरात आधार कार्ड नोंदणी प्र्िरकयेचा बोजवारा उडाला आहे.