बांद्याच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड
By Admin | Updated: November 12, 2014 23:57 IST2014-11-12T20:54:32+5:302014-11-12T23:57:19+5:30
१९ वर्षाखालील राष्ट्रीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धेसाठी निवड

बांद्याच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड
बांदा : येथील खेमराज मेमोरियल कनिष्ठ महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींची पंजाब येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील राष्ट्रीय शालेय हॅण्डबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय पातळीवर एकाचवेळी तीन विद्यार्थिनींची निवड होण्याची ही महाविद्यालयाची पहिलीच वेळ आहे. या विद्यार्थिनी राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.या संघामध्ये निरा बापू आईर, पूजा योगेश्वर शेर्लेकर, शितल तुकाराम नाईक या विद्यार्थिनींचा समावेश आहे. बांदा येथे पार पडलेल्या कोल्हापूर विभागीय हॅण्डबॉल स्पर्धेत खेमराज महाविद्यालयाच्या १९ वर्षाखालील मुलींच्या संघाने विजेतेपद मिळविले होते. वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत या खेळाडूंनी विशेष कामगिरी केली. १३ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पंजाब येथील अनंतपूरसाहेब येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत या विद्यार्थिनींची निवड महाराष्ट्र संघात करण्यात आली आहे.राज्यस्तरीय संघासाठी नांदेड येथील जिल्हा क्रीडा संकुलात सराव शिबिर घेण्यात आले. ६ ते १0 नोव्हेंबर या कालावधीत नांदेड येथे झालेल्या शिबिरात या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. खेळाडूंना क्रीडा शिक्षक लक्ष्मण पावसकर, नंदू नाईक व सुमेधा सावळ यांचे मार्गदर्शन लाभले. बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, प्रशासकीय अधिकारी एम. डी. मोरबाळे, समन्वय समिती सचिव डी. एल. मोरे, प्राचार्य बी. व्हि. देसाई, शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय पातळीवर खेळाडूंची निवड झाल्याने बांदा परिसरातून विद्यार्थिनींचे अभिनंदन होत
आहे. (प्रतिनिधी)