किल्ले सिंधुदुर्गवरील बंदरजेटी सदोष

By Admin | Updated: August 18, 2016 23:34 IST2016-08-18T23:34:15+5:302016-08-18T23:34:19+5:30

रवींद्र चव्हाणांचे चौकशीचे आदेश : पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या सोडवण्याची ग्वाही

Bandarjeeti fault on Sindhudurg fort | किल्ले सिंधुदुर्गवरील बंदरजेटी सदोष

किल्ले सिंधुदुर्गवरील बंदरजेटी सदोष

मालवण : किल्ले सिंधुदुर्ग येथे काँग्रेस आघाडी शासनाच्या काळात कोट्यवधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेली जेटी सदोष पद्धतीची आहे. याबाबत तक्रारीही प्राप्त झाल्या असून या जेटीकामाच्या चौकशीचे आदेश बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर असलेल्या मंत्री चव्हाण यांनी मालवण येथे बंदर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मच्छीमार व व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले.
मालवण शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या बैठकी दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, उपनगराध्यक्ष राजन वराडकर, आप्पा लुडबे, विलास हडकर, भाऊ सामंत, बबलू राऊत, विकी तोरसकर, संदीप शिरोडकर, महेश मांजरेकर, राजू राऊळ, पूर्वा ठाकूर, गजानन ठाकूर, गोपी पालव, धोंडी चिंदरकर, संतोष गावकर यासह भाजप कार्यकर्ते मालवणसह तारकर्ली, देवबाग येथील पर्यटन व्यावसायीक, तालुक्यातील ग्रामस्थ, बंदर विभागाचे अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या, परवाना प्रक्रिया सुलभ होण्याबाबत कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. मालवण बंदर जेटी येथे पक्क्या स्वरूपात व्यावसायिकांना गाळे उपलब्ध करून देणे, देवबाग येथे जेटी उभारणे, तारकर्ली खाडीतील गाळ उपसा, देवबाग ते भोगवे या खाडी मार्गावर फेरीबोट उपलब्ध करून देणे, जिओ ट्यूबच्या माध्यमातून बंधाराकम रस्ता उभारणे, मसुरे रमाई नदीतील गाळ उपसा करणे, कोळंब आडारी खाडीपात्रात जलपर्यटनाला प्राधान्य देणे, किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जीव रक्षकांची नियुक्ती तत्काळ करणे, प्रवाळ व कोरलच्या सुरक्षेस प्राधान्य देणे, तसेच गोव्याच्या धर्तीवर किनाऱ्यावर तात्पुरते तंबू उभारून पर्यटनाला अधिक गती देणे, या सर्वांबाबत सकारात्मक भूमिका दर्शवताना काही प्रश्न व समस्या सोडविण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. (प्रतिनिधी)


मालवण पालिकेत शतप्रतिशत भाजपा
मालवण पालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यात होत आहे. तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. या सर्व निवडणुकीत भाजपा निश्चितच मोठे यश मिळवेल, असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला. सर्वच निवडणुकीत शतप्रतिशत भाजप हेच लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकार आपल्या दारी
मालवण शहरात ‘सरकार आपल्या दारी’ या नव्या उपक्रमाचा रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते बुधवारी शुभारंभ करण्यात आला. शहरात घरोघरी जाताना सरकारच्या विविध योजनाची माहिती देण्यात येणार आहे. यावेळी समस्या जाणून घेण्यात येणार आहेत, अशी माहिती बाबा मोंडकर यांनी दिली.

Web Title: Bandarjeeti fault on Sindhudurg fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.