बांदा येथे रात्रीत १२ दुकाने फोडली
By Admin | Updated: July 1, 2014 23:58 IST2014-07-01T23:52:23+5:302014-07-01T23:58:32+5:30
रात्रीच्या गस्तीचा अभाव : व्यापाऱ्यांकडून पोलीस धारेवर; ३१,६०० रुपये लंपास

बांदा येथे रात्रीत १२ दुकाने फोडली
बांदा : बांदा शहरातील कट्टा कॉर्नर, बसस्थानक तसेच आळवाडी बाजारपेठीतील तब्बल १२ दुकाने काल, सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून आतील सुमारे ३१ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम घेऊन पोबारा केला. रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त नसल्यानेच चोरट्यांनी ही संधी साधली.
एका रात्रीत एवढ्या मोठ्या प्रमाणात दुकाने फोडण्याची ही पहिलीच घटना असल्याने बांद्यातील व्यापाऱ्यांनी याबाबत बांद्याचे सहायक पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे यांना जाब विचारला.
भर बाजारपेठेतील तब्बल बारा दुकाने फोडण्यात आल्याने बांदा शहरात एकच खळबळ उडाली आहे. काल आठवडा बाजार असल्याने रात्री उशिरापर्यंत बाजारपेठ सुरू असते. त्यामुळे मध्यरात्री एक ते पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही दुकाने फोडली असावीत, असा संशय व्यक्त होत आहे.
हेमंत विनायक दाभोलकर यांच्या दुकानातील ७५०० रुपयांची रोकड, भालचंद्र जयदेव बांदेकर यांच्या मालकीचे सुप्रभा फुटवेअर, शंकर आत्माराम वळंजू यांचे कोकम, काजूचे दुकान चोरट्यांनी फोडले. त्यानंतर चोरट्यांनी शिवाजी चौक येथील रूपेश राधाकृष्ण केसरकर यांच्या दुकानातील ७ हजार ८०० रुपये किमतीचे १० किलो काजूगर चोरून नेले.
सुदैवाने त्यांच्या कॅश काऊंटरमध्ये असलेला ५० हजार रुपये किमतीचा सही केलेला धनादेश चोरट्यांच्या हाती लागला नाही. त्यांच्या शेजारी असलेल्या
दिगंबर शिवराम चव्हाण यांच्या खत-बियाणे दुकानातील पाच हजार रुपयांची
रोकड, प्लास्टिक दुकानातील पाच
हजार रुपयांची रोकड व हार्डवेअर दुकानातील ५०० रुपयांची रोकड लंपास केली. (पान ७ वर)विठ्ठल मोहन जाधव यांच्या इलेक्ट्रिक दुकानातील दोन हजार रुपयांची रोकड, गजानन धोंडू तांडेल यांच्या पशुखाद्य दुकानातील आठ हजार रुपयांची रोकड, रोहिदास हरिश्चंद्र पिळणकर यांच्या चिकन सेंटरमधील ८०० रुपयांची चिल्लर, आनंद महाजन यांच्या तेल दुकानातील तसेच श्रीनिवास दिनकर सावंत यांच्या भूमिका कृषी सेवा केंद्राच्या दुकानाचे कुलूप व कडी कटावणीच्या साहाय्याने उचकटून रोख रक्कम लांबविण्यात आली.
पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुठे, उपनिरीक्षक सुधाकर आरोलकर यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. यावेळी लगतच असलेल्या आपा चिंदरकर यांच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. यावेळी रात्री १२ वाजून पाच मिनिटांनी पोलिसांची गाडी तेथून गेल्याचे दिसत आहे.
दुपारी ओरोस येथून श्वानपथकास पाचारण करण्यात आले. रूपेश केसरकर यांच्या दुकानातील वस्तूंचा वास श्वानास देण्यात आला. मात्र, श्वान लगतच असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडे घुटमळले. त्यामुळे चोरट्यांचा माग मिळाला नाही. (प्रतिनिधी)