दामदुप्पटीच्या आमिषाने एटीएम अपहार
By Admin | Updated: September 28, 2015 23:42 IST2015-09-28T22:12:40+5:302015-09-28T23:42:21+5:30
दोघांच्या कोठडीत वाढ : आणखी काही जणांची नावे उघड होणार

दामदुप्पटीच्या आमिषाने एटीएम अपहार
कणकवली : पैसे दुप्पट-तिप्पट करण्याच्या आमिषानेच एटीएम अपहार करण्यात आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यात आणखी काहींची नावे उघड झाली असून एटीएम अपहार प्रकरणात अक्षय सावंत आणि संतोष पाटोळे यांच्या पोलीस कोठडीत १ आॅक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.अपहार प्रकरणातील कुणाल सावंत याला जामीन मिळाला असून अक्षय सावंत आणि संतोष पाटोळे हे पोलीस कोठडीत आहेत. मात्र, कुणाल सावंत याच्या जामीनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणी पुढे न आल्याने तो सोमवारपर्यंत सावंतवाडी येथे तुरूंगातच होता.कुणाल सावंत याचा चुलत भाऊ अक्षय सावंत हा पैसे दुप्पट-तिप्पट करण्याचा प्रयत्न करत होता. त्याला मुंबईतील योगी पटेल याने या मोहजाळात ओढले होते. पैसे दुप्पट करण्याच्या नादात दोन-तीन वेळा मार खाऊन पैसे गमवावे लागले होते. हे पैसेही एटीएम अपहारातून कुणाल सावंत याने दिलेले होते. गेली सुमारे दोन-तीन वर्षे अपहाराची रक्कम दामदुप्पट करण्याच्या प्रयत्नांसाठी अशीच फिरत होती. योगी पटेलकडून फसवणूक झाल्यानंतर कुणाल सावंत हे बेळगांव येथेही असेच पैसे दामदुप्पट करून देतो म्हणून सांगणाऱ्यांच्या आहारी गेला होता, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. एटीएम अपहारातील आतापर्यंत साडेतेरा लाखाची रक्कम हस्तगत करण्यात आली असून चार चाकी आणि दुचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांचा पोलीस शोध घेत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक झाली
आहे. (प्रतिनिधी)