‘बाळू मामा’ देखावा सर्वप्रथम- युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजन :
By Admin | Updated: September 5, 2014 23:26 IST2014-09-05T22:01:59+5:302014-09-05T23:26:00+5:30
सावंतवाडी, वेंगुर्ले तालुका मर्यादित गणेश सजावट स्पर्धा

‘बाळू मामा’ देखावा सर्वप्रथम- युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजन :
तळवडे : युवा प्रतिष्ठान, वेंगुर्ले- सिंधुदुर्ग या सेवाभावी संस्थेने सलग सातव्या वर्षी आयोजित केलेल्या खुल्या, सावंतवाडी, वेंगुर्ले ताुलका मर्यादित गणेश सजावट स्पर्धेत होडावडे गावातील राजन केळूसकर यांनी साकारलेल्या ‘बाळू मामा’ देखाव्याने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक सोनुर्ली येथील रणजीत राऊळ यांच्या ‘संत ज्ञानेश्वर’, तर तृतीय क्रमांक सोनुर्ली येथील भाऊ गावकर यांच्या ‘मारिच वध’ या देखाव्याने मिळविला.
युवा प्रतिष्ठान वेंगुर्ले- सिंधुदुर्ग या संस्थेने सलग सातव्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत २० स्पर्धकांचा सामावेश करण्यात आला होता. पर्यावरण पूरक वस्तंूचा वापर, मातीचा वापर, प्रबोधनकारी विषय तसेच एखाद्या देखाव्यातून भक्तीमय प्रबोधन व्हावे, आजच्या तरुण पिढीला चांगला संदेश मिळावा, समाजातील अपप्रवृत्तींना आळा घालण्याबाबत प्रबोधन व्हावे यादृष्टीने युवा प्रतिष्ठानच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
गणेश सजावट स्पर्धेत होडावडे गावचे राजन केळूसकर यांनी ‘बाळू मामा’ हा आगळा-वेगळा देखावा साकारला होता. या देखाव्यातून त्यांनी पर्यावरण, भक्तीमार्ग आदीबाबत प्रबोधनात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केल्याने त्यांना प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला.
या स्पर्धेत ‘उत्कृष्ट गणेश मूर्ती’ साठीही विशेष बक्षीस ठेवण्यात आले होते. सोनुर्ली येथीलच अविनाश गाड यांनी स्वत: साकारलेल्या गणेशमूर्तीला उत्कृष्ट गणेश मूर्ती बक्षिसाने गौरविण्यात आले. गाड हे गोवा राज्यात प्रसिद्ध मूर्तिकार असून त्यांनी ‘तुकारामाचे ग्रंथ’ हा देखावा साकारला होता.
तसेच या स्पर्धेत उत्तेजनार्थ प्रथम होडावडे येथील राजन धुरी यांचा ‘संत गोरा कुंभार’, द्वितीय पेेंडूर येथील ज्ञानेश्वर मांजरेकर यांच्या ‘सीताहरण’ या देखाव्याला देण्यात आला. तृतीय उत्तेजनार्थ क्रमांक तळवडे येथील गावडे बंधूंच्या ‘सर्व जल अभियान’ (पाणी बचाव), तर वजराठचे नितीन चव्हाण यांच्या ‘नृसिंह तेजहरण’ या देखाव्यांना विभागून देण्यात आला.
स्पर्धेचे परीक्षण शिक्षक राकेश परब, सुनील गोवेकर यांनी केले. यावेळी युवा प्रतिष्ठानचे सचिव रामचंद्र कुडाळकर, कोषाध्यक्ष मंगेश माणगावकर, सुनील आजगावकर आदी उपस्थित होते.
स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व यशस्वी स्पर्धकांचे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र मातोंडकर,
सचिव रामचंद्र कुडाळकर
आणि पदाधिकाऱ्यांनी
अभिनंदन केले. (प्रतिनिधी)
युवा प्रतिष्ठान आयोजित ‘उत्कृष्ट आरास’ चे प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्त्री अत्याचार हा देशातील ज्वलंत विषय साकारणाऱ्या तळवडे गावातील सचिन सावंत यांच्या ‘स्त्री अस्मिता’ देखाव्यास देण्यात आले. या स्पर्धेत होडावडे गावचे गणेश जुवलेकर यांचा ‘अरुणोदय’, मातोंड मिरिस्तेवाडी येथील बाळा मोहिते (मंदिर), न्हावेली येथील अंकुश सखाराम नाईक (उंदीरमामाचे भजन), वजराठ येथील संजय लवू केरकर (घरगुती सजावट) यांनी सहभाग घेतला.