बहुजन समाजाने सर्वोच्च लक्ष ठेवावे
By Admin | Updated: July 28, 2015 21:55 IST2015-07-28T21:55:59+5:302015-07-28T21:55:59+5:30
के. जी. कानडे : संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंतांचा सत्कार

बहुजन समाजाने सर्वोच्च लक्ष ठेवावे
सातारा : ‘बहुजन समाजाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील टॉप मोस्ट पदाचे लक्ष ठेवून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करावा,’ असे आवाहन रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे यांनी केले.येथील संबोधी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या गुणवंतांच्या गौरव समारंभात स्पर्धा परीक्षा तसेच पीएच.डी. पदवी प्राप्त व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. कानडे यांच्या हस्ते छ. शिवाजी महाविद्यालाच्या सभागृहात करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. विचारपीठावर छ. शिवाजी महाविद्यालयाच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक डॉ. शिवाजीराव पाटील, संबोधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य अण्णासाहेब होवाळ, उपाध्यक्ष दिनकर झिंब्रे, कार्यवाह प्रा. रमेश जाधव उपस्थित होते.डॉ. कानडे म्हणाले, ‘संबोधी प्रतिष्ठानने सामाजिक भान ठेवून चालवलेले काम भूषणावह आहे. बहुजन समाजाचे विद्यार्थी यशस्वी होताना दिसत आहेत, हे कौतुकास्पद आहे. सध्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर फार मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढली आहे. संशोधन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत आहेत. त्यासाठीची रिक्त पदे आपली वाट पाहत आहेत, हे आव्हान स्वीकारणे. चांगली गुणवत्ता व यश संपादन करण्यासाठी सातत्य ठेवून प्रयत्न करण्याची गरज आहे.’
उपजिल्हाधिकारी डॉ. चारुशिला देशमुख, पीएच.डी. पदवीधारक डॉ. भास्कर कदम, डॉ. नामदेव तेलोरे (औंध ), रुचिरा इंगळे आदी गौरवार्थींनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. संजय संदे यांच्या वतीने प्रा. प्रशांत साळवी यांनी सत्कार स्वीकारला.
महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष प्राचार्य वि. न. लांडगे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. हौसेराव धुमाळ यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वस्त केशवराव कदम, रमेश इंजे, उत्तमराव पोळ, प्रा. डॉ. संजय कांबळे, विजय गायकवाड यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)