‘हातपाटी’मागचे ग्रहण अजूनही कायम
By Admin | Updated: September 24, 2015 23:51 IST2015-09-24T23:12:13+5:302015-09-24T23:51:52+5:30
परवान्यांची मुदत अपुरी : नव्या परवान्यांसाठी प्रतीक्षा आॅक्टोबरची

‘हातपाटी’मागचे ग्रहण अजूनही कायम
रत्नागिरी : जिल्ह्यातील हातपाटी उत्खननासाठी जिल्हा प्रशासनाकडून मागवण्यात आलेल्या १३४ पैकी ९२ प्रस्तावांना मंजुरी देऊन त्यांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र, त्यांना सप्टेंबरअखेर मुदत असल्याने आता नव्या परवान्यांसाठी पुन्हा आॅक्टोबरमध्ये मेरिटाईम बोर्डाकडून ‘ना हरकत’ दाखल्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
५०० ब्रासपर्यंतच्या वाळू उत्खननासाठी तात्पुरती परवानगी देण्याचा अधिकार जानेवारीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला होता. मात्र, त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयाने पुन्हा बंदी लागू करण्यात आली होती. आता नदी, खाड्यांतील वाळू उत्खननासाठी परवाने देण्याचे अधिकार मेरिटाईम बोर्डाकडे देण्यात आले आहेत.
मेरिटाईम बोर्डाकडून दापोली तालुक्यातील आंजर्ला खाडीतील तीन, दाभोळ खाडीतील एक, रत्नागिरी तालुक्यातील जयगड खाडीतील तीन आणि काळबादेवी खाडीतील एक अशा एकूण चार खाड्यांमधील ८ रेती गटांना हातपाटीसाठी रेतीसाठा निर्धारित करून देण्यात आला आहे. या खाडीतील हातपाटी उत्खनन परवान्यासाठी मेरिटाईम बोर्डाकडून नाहरकत दाखल्यासह आतापर्यंत १३४ प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले होते.
त्यापैकी ९२ प्रस्ताव मंजूर करून त्यांना परवाने देण्यात आले. काहींनी चलन न भरल्याने त्यांना परवाने मिळाले नाहीत. अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत आहे. यासाठी मेरिटाईम बोर्डाकडून मिळालेल्या ‘ना हरकत दाखल्यां’ची मुदतही सप्टेंबरअखेरची आहे.
परवाने देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने वाळू व्यावसायिकांच्या व्यवसायावरील ग्रहण कित्येक वर्षांनंतर सुटले आहे. मात्र, ही मुदत सप्टेंबरअखेर आहे. आता आॅक्टोबरमध्ये नव्याने प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. यासाठी पुन्हा मेरिटाईम बोर्डाकडून परवानगी मिळवावी लागणार आहे. त्यानंतर या व्यावसायिकांना परवाने मिळणार आहेत. या परवान्यांची मुदत एक वर्षाची असेल. त्यामुळे आता या व्यावसायिकांना आॅक्टोबरची प्रतीक्षा लागून राहिली आहे. नवीन परवाने लवकर मिळण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)