पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते
By Admin | Updated: November 9, 2014 23:40 IST2014-11-09T21:22:58+5:302014-11-09T23:40:33+5:30
रामदास फुटाणे : कुडाळ येथे कला, साहित्य, व्यावसायिक क्षेत्रातील गुणवंत व्यक्तींचा गौरव

पुरस्कारामुळे प्रेरणा मिळते
कुडाळ : येथील अॅड. डी. डी. देसाई फाऊंडेशनच्यावतीने समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना अॅड. डी. डी. देसाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारांमुळे समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रेरणा मिळणार असून भविष्यात हा पुरस्कार अजरामर होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यात केले.
अॅड. डी. डी. देसाई यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त यावर्षीपासून त्यांच्या नावाने साहित्य, कला, सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्याचे अॅड. डी. डी. देसाई फाऊंडेशनने जाहीर केले. हा पुरस्कार वितरण सोहळा कुडाळच्या हायस्कूलच्या सांस्कृतिक भवनात पार पडला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाध्यक्ष रामदास फुटाणे, प्रमुख पाहुणे व हास्यकवी अशोक नायगावकर, फाऊंडेशनचे अध्यक्ष संग्राम देसाई, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, कवी डॉ. महेश केळूसकर, रुजारिओ पिन्टो यांच्यासह पहिल्याच पुरस्काराचे मानकरी ठरलेले सि. श. उपाध्ये, डॉ. मधुकर सवदत्ती व संदीप परब उपिस्थत होते.
पुरस्कारप्राप्त उपाध्ये हे गेली ४० ते ४५ वर्षे ‘आरती’ मासिक चालवितात. तर वैद्यकीय क्षेत्रात गेल्या ४० वर्षांपासून कुडाळ तालुक्यातील सर्वसामान्य डॉक्टर म्हणून ओळख निर्माण करणारे आणि अनाथ, अंध, अपंग मुलांची सेवा करणारे डॉ. मधुकर सवदत्ती यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तर अनाथ, निराधार वृद्धांचे आधार बनून गेली अनेक वर्षे त्यांची सेवा करणारे आनंदाश्रम व संविताश्रम चालविणाऱ्या अणाव येथील संदीप परब यांना सामाजिक क्षेत्रात काम केल्याप्रकरणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी डॉ. सवदत्ती यांनी पुरस्कारातून मिळालेल्या पाच हजारांची रक्कम संदीप परब यांच्या ‘आनंदाश्रम’ या वृध्दाश्रमासाठी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दिली. यावेळी पुरस्कारप्राप्त उपाध्ये म्हणाले, येथील लेखक, कवी यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम केले व करीत राहणार. तर संदीप परब म्हणाले, हा पुरस्कार माझ्याबरोबर सतत काम करणाऱ्या सहकाऱ्यांचा आहे. जिल्हावासीयांनी आम्ही चालवित असलेल्या आनंदाश्रम व संविताश्रमाला भरभरून मदत दिलीे असून कुडाळातील सर्वच डॉक्टरांनीही आम्हाला वेळोवेळी मदत केली. तर कुडाळातील सर्वच डॉक्टरांनीही आम्हाला वेळोवेळी मदत केली. अन्यायाविरुद्ध लढणारे, सडेतोड वृत्तीचे, अध्यात्मिक साहित्याची ओढ असणारे, सखोल ज्ञानी असणारे व समाज कार्यासाठी वाहून घेतलेल्या अॅड. डी. डी. देसाई यांचे काम अगाध आहे. अॅड. डी. डी. देसाई आज हवे होते. कारण समाजाला अशा व्यक्तिमत्वाची गरज नेहमीच होती व राहणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही डीडींचे कार्य मोठे होते, असे पुरस्कारप्राप्त डॉ. मधुकर सवदत्ती म्हणाले. प्रास्ताविक आनंद वैद्य, तर सूत्रसंचालन व आभार उदय वेलणकर यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, तसेच अॅड. डी. डी. देसाईप्रेमी उपस्थित होते. या कार्यक्रमाची यशस्वी धुरा फाऊंडेशनचे अधिकारी केदार सामंत, अमित सामंत, गजानन कांदळगावकर व इतर सदस्यांनी पार पाडली. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर उपस्थित कवींचे काव्यसंमेलन पार पडले. (प्रतिनिधी)
पुरस्कार प्रदान
अॅड. डी. डी. देसाई यांच्या नावे यावर्षीपासून दिले जाणारे पुरस्कार साहित्य व कला क्षेत्रात काम करणारे सि. स. उपाध्ये, व्यावसायिक क्षेत्रातील डॉ. मधुकर सवदत्ती तर सामाजिक क्षेत्रातील संदीप परब यांना हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या हस्ते देण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पाच हजार रुपये असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.