जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न : जठार
By Admin | Updated: October 19, 2014 22:45 IST2014-10-19T22:10:13+5:302014-10-19T22:45:31+5:30
राज्यात सरकार आले याचा आनंद जास्त आहे

जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न : जठार
कणकवली : पराभव झाला या दु:खापेक्षा राज्यात सरकार आले याचा आनंद जास्त आहे. केंद्र व राज्यातील सत्तेच्या आधारे जिल्ह्यातील प्रश्न मार्गी लावण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेणार असल्याचे प्रतिपादन प्रमोद जठार यांनी केले. निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजन म्हापसेकर, रंगनाथ गवस, शिशीर परूळेकर, बबलू सावंत आदी उपस्थित होते.
राणे कुटुंबीयांच्या विरोधातील मतांमध्ये विभागणी झाल्याने पराभव झाला. तो मी मान्य करतो. मतविभागणी टाळता आली असती तर चित्र बदलले असते. परंतु पैशापुढे बाकी सर्व फिके पडते हे दिसून आले. ज्यांनी आपणास मतदान केले त्या सर्वांचा आभारी आहे. कुडाळ मतदारसंघातून जिंकलेले वैभव नाईक आणि सावंतवाडीतून जिंकलेले दीपक केसरकर या दोघांचे अभिनंदन करतो, असे जठार म्हणाले.
विरोधी पक्षाचा आमदार असताना जेवढे काम केले नाही. तेवढे आता आमदार नसताना करून दाखवेन. त्यासाठी केंद्र व राज्यातील सत्तेचा वापर केला जाईल. भाजपा कार्यकर्त्यांनी या पराभवाने विचलित होऊ नये. तिनही ठिकाणी पराभव झाला तरी केंद्र व राज्यातील सत्ता व्यवस्थित राबवली तर भविष्यात सर्व सत्तास्थाने काबीज करू शकतो. पक्षश्रेष्ठी आपली काळजी घेण्याचा निश्चित प्रयत्न करतील. नारायण राणेंच्या पराभवाने त्यांची राजकीय कारकीर्द संपल्यात जमा आहे. नारायण राणेंच्या पराभवाच्या दु:खापेक्षा आपले दु:ख मोठे नाही. हरलो तरी राजकीय रिंग्ांणात राहून विकासकामांचा पाठपुरावा करू असे सांगून पराभव पचवून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन जठार यांनी केले. (प्रतिनिधी)