आरोपीचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: May 28, 2017 23:30 IST2017-05-28T23:30:17+5:302017-05-28T23:30:17+5:30
आरोपीचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न

आरोपीचा कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मारहाणप्रकरणी अटकेत असलेल्या ३२ वर्षीय तरुणाने पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी दुपारी १.३० च्या सुमारास घडली. नीलेश विजय सनगरे (कारवांचीवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलेश सनगरे याने शनिवारी सकाळी ९.४५च्या सुमारास टेम्पोवर लोखंडी रॉड मारून नुकसान केले होते. टेम्पोचे नुकसान केल्याचा जाब विचारण्यासाठी सचिन भोसले (३३, बाजारपेठ, रत्नागिरी) हे नीलेश याच्याकडे गेले होते. नीलेश याने त्याचा राग मनात धरून लोखंडी रॉडने सचिन भोसले यांना मारहाण केली होती. सचिन यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून नीलेश सनगरे याला ताब्यातही घेतले होते.
दरम्यान, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र वळवी हे सकाळी पोलीस कोठडीजवळ
सेवा बजावत होते. दुपारी १.३०च्या
सुमारास नीलेश सनगरे याने पोलीस कोठडीमध्ये आराडाओरडा करण्यास सुरुवात केली.
भिंतीवर डोके आपटून स्वत:ला गंभीर जखमी करून घेत त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे नीलेश याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे नीलेश सनगरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.