जिल्हा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला
By Admin | Updated: November 27, 2014 00:26 IST2014-11-26T22:28:00+5:302014-11-27T00:26:26+5:30
तुळसुली शाखेतील घटना : वाढत्या चोरींमुळे नागरिकांत घबराट; प्रशासन अपुरे पडले

जिल्हा बँक लुटण्याचा प्रयत्न फसला
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील तुळसुली येथील सिंधुदुर्ग जिल्हा बँक मंगळवारी रात्री फोेडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिजोरी उघडता न आल्याने चोरांचा हा प्रयत्न फसला. तालुक्यातील वाढत्या चोरींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाचे चोरांना पकडण्याचे प्रयत्न अपुरे पडत आहेत.
तुळसुली येथील रस्त्याच्या कडेलाच सिंधुुदुर्ग जिल्हा बँकेची शाखा तेथील माध्यमिक विद्यालयाच्या आवारात आहे. ही बँक मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी फोडली. मात्र, त्यांना पैसे ठेवलेले लॉकर्स उघडता न आल्याने रिकाम्या हातांनीच पळून जावे लागले. घटनास्थळाची पाहणी करताच असे लक्षात आले की, चोरट्यांनी बाहेर लावलेल्या सायरनचा भोंगा अगोदरच कापून टाकला. जेणेकरून सायरनचा आवाज होऊ नये, तसेच मुख्य दरवाजा व आतील दोन दरवाजांची मिळून सुमारे पाच मोठी कुलूपे तोडून टाकली. तसेच तिजोरीही फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र, तिजोरी न उघडल्याने चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला.
सायरनची वायर रात्री एक वाजण्याच्या दरम्यान कापण्यात आली, त्याचवेळी बँकेचे मॅनेजर प्रकाश चव्हाण यांना त्यांच्या मोबाईलवर तसा मॅसेज आला. त्यांनी लगेचच तुुळसुली माध्यमिक विद्यालयाचे रात्रपाळी करणारे शिपाई भिकाजी जाधव व बँकेचे शिपाई रामदास तुळसुलकर यांना मोबाईलवर संपर्क साधीत बँकेवर दरोडा पडत असल्याची माहिती दिली. तसेच आपणही पिंगुळीहून निघालो असल्याचे सांगितले.
दोघांनाही मॅनेजर चव्हाण यांचा फोन येताच जाधव व तुळसुलकर हे जिल्हा बँक गाठत दुचाकीचा प्रकाशझोत गेटवर टाकला. मात्र, दरवाजाची कुलुपे फोडलेली होती, परंतु आतमध्ये कोणीही नसल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, घटनेची माहिती पसरताच परिसरातील ग्रामस्थांनी बँकेच्या आवारात गर्दी केली होती. तसेच कुडाळ पोलीस उपअधीक्षक गणेश इंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. पी. पवार, उपनिरीक्षक सतीश निकम, तसेच अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तर सकाळी विभागीय पोलीस अधीक्षक उत्तम चौरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बँकेच्या तसेच शाळेच्या कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
चोरांची टोळी आहे का?
हल्लीच्या चोरीच्या घटना पाहता, चोरट्यांनी जास्तीत जास्त रस्त्याकडेच्याच मोठ्या शाळा फोडल्या आहेत. लिंगेश्वर तुळसुली विद्यालयाच्या इमारतीतच ही जिल्हा बँकेची शाखा असल्याने चोरट्यांची टोळी आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मागील काही महिन्यांमध्ये जिल्ह्यात चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. बंद घरे, दुकाने, शाळांनंतर आता बँकेच्या शाखांमध्येही चोऱ्या होऊ लागल्या आहेत. परंतु यातील बऱ्याचप्रकरणांपैकी चोरट्यांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.
चोरांना लवकरच अटक करणार - पोलीस अधीक्षक
जिल्ह्यात चोऱ्या करीत असलेल्या चोरट्यांच्या मुसक्या पोलीस प्रशासन लवकरच आवळणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कुडाळ येथे बोलताना दिली.
वारंवार चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून बुधवारी रात्री चोरट्यांनी तुळसुली येथील सिंधुदुर्ग बँक फोडण्याचा प्रयत्न केला. या घटनास्थळाची पाहणी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यांनी केली. यावेळी त्यांनी सांगितले की, वाढत्या चोऱ्या रोखण्याकरिता पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.
लवकरच पोलीस चोरट्यांच्या
मुसक्या आवळणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)
बँकेची सुरक्षा ‘राम भरोसे’
जिल्ह्यात चोरीचे प्रमाण वाढलेले असतानाही बँकेची सुरक्षा मात्र ‘राम भरोसे’ असल्याचे दिसून आले. यामध्ये मुख्य दरवाजाकडील लाईट बंदावस्थेत, सीसीटीव्ही कॅमरे नाहीत, सुरक्षा रक्षक नाही, दरवाजाही भक्कम स्वरुपाचा नसल्याचे निदर्शनास आले. बँकेचे मॅनेजर चव्हाण यांनी मॅसेज आल्यावर तत्काळ शिपाई जाधव यांना फोन केला हे चांगलेच केले, परंतु त्याचवेळी पोलिसांना कळविले असते, तर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचून कदाचित चोरटे मिळाले असते, असे पोलिसांनी सांगितले.