नितेश राणेंचा प्रशासनावर हल्लाबोल
By Admin | Updated: March 14, 2017 14:49 IST2017-03-14T14:49:17+5:302017-03-14T14:49:17+5:30
सिंधुदुर्गातील माकडतापाकडे दुर्लक्ष होत असल्याने काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला आहे.

नितेश राणेंचा प्रशासनावर हल्लाबोल
ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग , दि. 14 - काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी बांदा परिसरातील माकडतापग्रस्त भागाला भेट दिली. परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. माकडतापाकडे दुर्लक्ष करणाऱ्या यंत्रणेसह सत्ताधाऱ्यांचा त्यांनी यावेळी समाचार घेतला. माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे कोणतेही पूर्व नियोजन नाही. वचक नसल्यानेच प्रशासनाने माकडतापाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. माकडतापाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात पसरल्यास आवश्यक लसीचा पुरवठा प्रशासनाकडे नाही, असे आरोप यावेळी राणे यांनी प्रशासनावर केले.
मंत्री आणि आमदार येतात व जातात . भेट द्यायला हे काय पर्यटनस्थळ आहे ?, असा संतप्त सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. माकडतापाने मेलेली 50 ते 60 माकडं शेजारच्या एका राज्याने जिल्ह्यात पुरल्याने माकडतापाचा प्रादुर्भाव वाढला. पण ही माहिती प्रशासन का लपवून ठेवतयं ?, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
फक्त आढावा बैठका घेऊन आणि कॅमेऱ्यासमोर प्रशासनाला दम भरून माकडताप आटोक्यात येणार नाही, असा टोलाही नितेश राणे यांनी पालकमंत्री दीपक केसरकर आणि आमदार वैभव नाईक यांना लगावला आहे.