वेंगुर्ल्यात बिबट्याचा युवकावर हल्ला

By Admin | Updated: November 14, 2014 00:14 IST2014-11-14T00:10:10+5:302014-11-14T00:14:50+5:30

डोक्याला दुखापत : कुटुंबीयांच्या प्रसंगावधानामुळे बचावला

The attack on a leopard in Vengurlia | वेंगुर्ल्यात बिबट्याचा युवकावर हल्ला

वेंगुर्ल्यात बिबट्याचा युवकावर हल्ला

वायंगणी : वेंगुर्ले रामघाट रोड येथील परशुराम बसाप्पा तलवार (वय २२) या युवकावर बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. मात्र, घरातील व्यक्तींच्या प्रसंगावधानाने तो बचावला. या घटनेने रामघाट रोड परिसर तसेच वेंगुर्ले शहरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आज, गुरुवारी सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा केला.
रामघाट रोड पूर्ण प्राथमिक शाळेनजीक हनुमंत तलवार यांचे घर आहे. तलवार यांच्या घराकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतीतून कसरत करत जावे लागते.
नम्रता तलवार या घराच्या पाठीमागील बाजूस असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शेजारील आंबा बागेमध्ये आवाज आला म्हणून त्यांनी परशुराम तलवार यांना सांगितले. परशुराम तलवार बॅटरी घेऊन आवाजाच्या दिशेने गेला असता, तेथील आंब्याच्या झाडावर बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. त्याला काहीच न समजल्याने त्याने पळण्याचा प्रयत्न केला; परंतु कंपाऊंडच्या तारेला अडकून तो जमिनीवर पडला.
पुन्हा उठून घरामध्ये जात असताना दरवाजाला डोके धडकले. त्यावेळी त्याचे वडील बसाप्पा, आई पार्वती व बहीण नम्रता, भाऊ उल्हास व तीन वर्षाची राधिका तलवार या सर्वांनी मोठ्याने आरडाओरडा केला. मात्र, त्याचवेळी प्रसंगावधान राखत कुटुंबीयांनी परशुराम यांना घरात खेचून घेऊन दरवाजा बंद केला. बिबट्या परशुरामला पकडण्यासाठी घराच्या पाठीमागील कंपाऊंड ओलांडून अंगणापर्यंत आला. घरातील व्यक्तींच्या सतर्कतेमुळे परशुराम वाचला असला तरी या घटनेत परशुरामच्या पायाला, हाताला व डोक्याला दुखापत झाली.
बंदोबस्ताची मागणी
या घटनेबाबत पोलीस ठाणे व वनविभागाला अणसूर सरपंच संजय गावडे यांनी माहिती दिली. घटना समजताच शेखर साळगावकर, सुनील चव्हाण, रॉबर्ट अरावूज, जुजे मेंडिस यांच्यासह नागरिकांनी धाव घेतली. गेले दहा ते पंधरा दिवस या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. यापूर्वी गेल्या महिन्यात वडखोल गोवर्धनवाडी येथील विठू धाऊ शेळके यांच्या तीन शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला होता.
तसेच वडखोल, रामघाट, भटवाडी, सेंट हॉस्पिटल परिसर या भागात बिबट्याने दर्शन दिले असून कुत्र्यांचा फडशा पाडला आहे. यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी होत आहे.
गुरुवारी सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मात्र, घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी उशिरा आल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत होती. (वार्ताहर)

Web Title: The attack on a leopard in Vengurlia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.