सहायक पोलीस निरीक्षकास पकडले
By Admin | Updated: September 11, 2015 00:43 IST2015-09-11T00:42:55+5:302015-09-11T00:43:14+5:30
लाच घेताना सावंतवाडीत कारवाई : पोलीस उपअधीक्षकांचा हात असल्याचीही तक्रार

सहायक पोलीस निरीक्षकास पकडले
सावंतवाडी : क्वॉरी खंडणी प्रकरणातून नाव वगळण्यासाठी दोन लाखांची ला मागणारे सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र राजाराम शेलार याला रत्नागिरी येथील लाचलुचपत विभागाने ५० हजारांची लाच घेताना गुरुवारी रंगेहात पकडले.
ही कारवाई शेलार राहत असलेल्या राजरत्न अपार्टमेंट पार्किंगमध्ये स्विफ्ट कारमध्ये केली. याबाबतची तक्रार सावंतवाडीचे उपसभापती महेश रमेश सारंग (रा. कोलगाव, ता. सावंतवाडी) यांनी केली होती. यावेळी लाचलुचपत विभागाने शेलार याची स्विफ्ट कारही जप्त केली.
दरम्यान, तक्रारदार महेश सारंग यांनी या प्रकरणात पोलीस उपअधीक्षक उत्तम चौरे यांचा हात असून, त्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय करळे यांच्याकडे केली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, माडखोल कारिवडे येथील क्वॉरीमधील कामगारांना मारहाण करीत आपल्याकडे अडीच लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार यशवंत देसाई यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात ३० आॅगस्टला दिली होती. पोलिसांनी ३१ आॅगस्टला खंडणीचा गुन्हा दाखल करीत यामध्ये माडखोल, कारिवडे परिसरातील दहाजणांना अटक केली. या प्रकरणाचा तपास महेंद्र शेलार करीत होते. त्यांनी न्यायालयात या प्रकरणामागचा सूत्रधार वेगळाच असल्याचे सांगत आरोपीची पोलीस कोठडी घेतली होती. त्यानंतर ते महेश सारंग यांच्यावर दबाव आणत, जर तुम्ही दोन लाख दिले, तर या प्रकरणातून बाहेर काढू, असे सांगितले होते.
सारंग यांनी शेलार यांच्या राजरत्न अपार्टमेंटमधील गणपती मंदिरात २ आॅगस्टला भेट घेतली आणि हा व्यवहार एक लाख दहा हजार रुपयांना ठरविला. त्यानुसार या रकमेतील पहिली ५० हजारांची रक्कम त्याचवेळी सारंग यांनी दिली. तर उर्वरित रकमेसाठी महेंद्र शेलार तगादा लावत होते. त्यामुळे त्यांना गुरुवारचा अवधी देण्यात आला होता. मात्र, दुसरीकडे सारंग यांनी ठाणे येथील लाचलुचपत विभागाचे अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यांनी रत्नागिरीचे लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सतीशकुमार गुरव यांच्याकडे ही जबाबदारी सोपविली.
त्याप्रमाणे त्यांनी कारवाईबाबत माहिती घेतली आणि महेंद्र शेलार राहत असलेल्या राजरत्न अपार्टमेंटच्या शेजारी कारवाई करण्याचे निश्चित झाले. दुपारी सव्वा चारच्या सुमारास महेंद्र शेलार ठाणे येथे न्यायालयीन तारीख असल्याने घरातून निघाले.
त्यांनी सारंग यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. त्यावेळी सारंग हे त्याच्या पार्किंगमधील स्विफ्ट कार (महा. १२ केवाय ९१९१) मध्ये बसले आणि ५० हजारांची रक्कम त्यांच्या हातात ठेवली. त्यांनी रक्कम गाडीच्या डिकीमध्ये ठेवली. त्याचवेळी रत्नागिरी लाचलुचपत विभागाच्या पथकाने शेलारला पकडले. रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू होती. पोलिसांनी शेलार यांच्या मोबाईलसह कार जप्त केली आहे. महेंद्र शेलार हे मूळचे शिरूर (जि. पुणे) येथील असून या कारवाईनंतर लाचलुचपत विभागाने सावंतवाडी व शिरूर येथील घराची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, तक्रारदार उपसभापती महेश सारंग यांनी सांगितले की, माझे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याची धमकी देऊन माझ्याकडे पैसे मागत होते. या प्रकरणात पोलीस उपअधीक्षक उत्तम चौरे यांचाही समावेश असून त्यांनी खंडणी प्रकरणातील आरोपीवर माझे नाव घेण्यासाठी दबाव आणत होते. त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग लाचलुचपत विभाग अंधारात
महेंद्र शेलार यांच्यावर कारवाई रत्नागिरी येथील लाचलुचपत विभागाने केली असून, गेले दोन दिवस रत्नागिरी येथील लाचलुचपत विभागाचे पथक सावंतवाडीत पंच तसेच अन्य बाबी जोडण्याचे काम करीत होते; पण याची पुसटशी कल्पना सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागाला लागू दिली नाही. कारवाई झाल्यानंतर सिंधुदुर्ग लाचलुचपत विभाग उशिरा सावंतवाडीत दाखल झाले.
सावंतवाडी पोलीस ठाण्यात सन्नाटा
महेंद्र शेलार यांची सावंतवाडी पोलीस ठाण्यात सिंघम अशी प्रतिमा झाली होती. ते कोणत्याच कारवाईला मागे हटत नसत. मात्र, गुरुवारी झालेल्या कारवाईने पोलीस ठाण्यात सन्नाटा पसरला होता. अनेक पोलिसांना अश्रू अनावर झाले होते. एक वर्षापूर्वी शेलार ठाणे येथून सावंतवाडीत रुजू झाले होते. अनेक प्रकरणांत ते वादग्रस्त ठरले होते.