विधानसभा निवडणूक : मतदान प्रक्रियेसाठी तरूणाईचाही उत्साही पुढाकार

By Admin | Updated: October 16, 2014 00:08 IST2014-10-15T23:29:00+5:302014-10-16T00:08:04+5:30

चिपळुणात सर्वाधिक मतदानाची नोंद,,रत्नागिरी दापोली-मंडणगडात शांततेत मतदानमतदारसंघात

Assembly election: Tarunikeachi enthusiast initiative for the polling process | विधानसभा निवडणूक : मतदान प्रक्रियेसाठी तरूणाईचाही उत्साही पुढाकार

विधानसभा निवडणूक : मतदान प्रक्रियेसाठी तरूणाईचाही उत्साही पुढाकार

चिपळूण : चिपळूण - संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आज (बुधवारी) विधानसभेसाठी उत्साही वातावरणात परंतु, शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. नवमतदार व तरुणांनी मतदान केले. एकूण सरासरी ६५ टक्के मतदान झाल्याची माहिती उपलब्ध झाली. जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद चिपळूण तालुक्यात झाल्याचे सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.चिपळूण - संगमेश्वर मतदार संघात सकाळपासून मतदानाला शांततेत सुरुवात झाली. प्रत्यक्ष मतदान सुरु होण्यापूर्वी त्या त्या निवडणूक केंद्रावर सकाळी ६ ते ७ या वेळेत मॉगपॉल घेऊन मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली. मॉगपॉलच्यावेळी अलोरे, असुर्डे, पेठमाप व संगमेश्वर तालुक्यातील एका केंद्रावर यंत्रात वेळ नीट अ‍ॅडजेस्ट केली नव्हती म्हणून त्यातील काही यंत्र बदलण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात मतदान सुरु झाल्यानंतर ते शांततेत पार पडले.
सकाळी ७ ते ९ या पहिल्या दोन तासांत १३.२२ टक्के, ९ ते ११ या वेळेत २९.६२ टक्के, ११ ते १ या कालावधीत ४०.०५ टक्के, १ ते ३ या कालावधीत ४९.२४ टक्के, ३ ते ५ या कालावधीत ५९.४० टक्के मतदान झाले. शेवटच्या २ तासात १०.१६ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ६ वाजता मतदान संपण्याच्या वेळी सरासरी ६५ टक्के मतदान झाले आहे.
विधानसभा मतदारसंघात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. सर्वत्र शांततेत आणि उत्साहाने मतदान झाले. दुपारनंतर काही काळ मतदानाचा वेग मंदावला होता. काही कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी सायंकाळीच मतदान केले. मतदानाच्या प्रक्रियेसाठी शासकीय यंत्रणेने जनजागृती केली होती. शिवाय मतदानाच्या स्लिपा घरोघरी पोहोचवल्या होत्या. त्यामुळे मतदान केंद्राबाहेर फारसे बूथ नव्हते. शिवाय जेथे बूथ होते त्या बूथचा मतदारांना फारसा उपयोग झाला नाही. अनेक बूथवर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते ताटकळत बसलेले आढळले. (प्रतिनिधी)

दापोली-मंडणगडात शांततेत मतदान
दापोली : दापोली विधानसभा मतदारसंघात आज (बुधवारी) ३६० मतदान केंद्रात मतदान शांततेत पार पडले. मात्र, सकाळी पाजपंढरी येथील मतदान केंद्रात व नानटे येथील मतदान केंद्रात मशीन बंद पडल्याने नवीन मशीन येईपर्यंत मतदारांना ताटकळत थांबावे लागले. परंतु कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
दापोली विधानसभा मतदारसंघातील पाजपंढरी येथील मतदान केंद्र १५३ व १५४ या मतदार केंद्रावर सकाळी ७ वाजल्यापासून मतदारांनी मतदान करायला सुरुवात केली. परंतु थोड्याच वेळात १५४ मतदान केंद्रातील मशीन बंद पडले. त्यानंतर १५३ मतदान केंद्रातील मशीन बंद पडल्याने या मतदान केंद्रात मतदाराने मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. तरुण, तरुणी, महिला, पुरुष व वयोवृद्ध मतदारांनीही मतदानाला चांगला प्रतिसाद दिला. पाजपंढरी मतदान केंद्रावर दोनवेळा मशीन बंद पडल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडाला. मशीन बंद पडल्याने दापोलीतून २ मशीन मागवण्यात आली. तब्बल दोन तासानंतर पुन्हा मतदान सुरु झाले.
पाजपंढरी येथील अपंग बांधवांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पाजपंढरी गावात सुमारे १०० अपंग बांधव आहेत. या बांधवांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करुन आपला उत्साह दाखून दिला. अपंग बांधव उन्हातून मतदान केंद्राकडे येत होते. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे मानून त्यांनी मतदान केले. अपंग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष अनिल रघुवीर यांना उचलून मतदान केंद्रात घेऊन गेले. अपंग बांधव कुबड्या हातात घेऊन तर काही अपंग बांधव आपल्या तीन चाकी सायकल रिक्षातून आले. पाजपंढरी गावातील १०० टक्के अपंग बांधवांनी मतदानाचा हक्क बजावला. अनेक मतदान केंद्रावर लांबलचक रांगा दिसत होत्या. दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदा कुणबी वाड्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. (प्रतिनिधी)

रत्नागिरी  मतदारसंघात शांततेत मतदान
रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आज (१५ आॅक्टोबर) सर्वत्र अत्यंत शांततेत सुमारे ५५ टक्के मतदान झाले. रत्नागिरी शहरातील ७ प्रभाग व परिसरातील गावात असलेल्या मतदान केंद्रांवरही शांततापूर्ण वातावरणात मतदान झाले. मात्र, जिल्ह्याच्या तुलनेत रत्नागिरीतील मतदानाचा वेग सकाळपासूनच मंद होता. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेला झालेले मतदान कमी असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोणाच्या गळ्यात मतदारांनी विजयश्री घातलीय, हे येत्या १९ आॅक्टोबरला स्पष्ट होणार आहे.
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात २ लाख ६५ हजार २२२५ एवढे मतदार असून, त्यांच्या हाती निवडणूक रिंगणातील ११ उमेदवारांचे भवितव्य होते. आज मतदानानंतर हा भवितव्याचा पेटारा मतदान यंत्रात बंद झाला. रत्नागिरीत अनेक मतदान केंद्रांना आज भेट दिली असता सकाळी ७ ते ९ वाजता या पहिल्या दोन तासात अत्यल्प मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासात मतदानाच्या टक्केवारीत काहीशी वाढ झाली. परंतु ज्या गतीने मतदान सुरु होते त्यावरून सायंकाळपर्यंत मतदानाची लोकसभेची टक्केवारी पार होईल का, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. मात्र, शहरातीलच मांडवी येथील २०० व २०१ या मतदान केंद्रात दुपारी ११ ते १ वाजता या दोन तासात मतदानाचा वेग मोठा होता. १ वाजेपर्यंत या दोन्ही मतदान केंद्रामध्ये अनुक्रमे ४७ टक्के व ४२ टक्के एवढे मतदान झाले होते. मिरकरवाडा येथील ६२१ या मतदान केंद्रात सकाळी ७ ते ९ या दोन तासात ८.२१ टक्के, ९ ते ११ या वेळेत १७.३९ टक्के, ११ ते १ वाजता ३७.८४ टक्के मतदान झाले होते. लक्ष्मीचौकातील २०४, २०५ या दोन्ही मतदान केंद्रामध्ये दुपारी १ वाजेपर्यंत अनुक्रमे ४५.७८ व ४९.७२ टक्के मतदान झाले होते. पटवर्धन प्रशालेतील १९५, १९६, १९७ व १९८ या क्रमांकांच्या मतदान केंद्रात दुपारी १ वाजेपर्यंत अनुक्रमे ३९.७८, ३३.८३, ३५.८५ व ३६.७५ टक्के एवढे मतदान झाले. कुवारबाव उत्कर्षनगर जिल्हा परिषद शाळेतील तीन मतदान केंद्रातही शांततेत मतदान झाले. (प्रतिनिधी)

गुहागरात ६० टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद
गुहागर : गुहागर मतदारसंघात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६०.१० टक्क्याहून अधिक मतदान झाले होते. कुठेही अनुचित प्रकाराची नोंद झालेली नाही. खोपी (खेड) येथील एकमेव मतदानयंत्रामध्ये बिघाड जाणवल्याने हे यंत्र तातडीने बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयकृष्ण फड यांनी दिली.
सकाळी ७ वाजल्यापासून मतदान केंद्रावर गर्दी दिसत होती. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत १४.७५ टक्के मतदान झाले होते. ११ वाजेपर्यंत २२.७७ टक्के, १ वाजेपर्यंत ३२.६५ टक्के, ३ वाजेपर्यंत ४९.०७ टक्के, तर ४ वाजेपर्यंत ५५ टक्क्यांहून अधिक मतदान झाल्याची नोंद झाली होती.
मतदारसंघात ३१६ मतदान केंद्र असून, यामध्ये गुहागरमधील शृंगारतळी, कुटगिरी व अडूर, चिपळूणमधील नायशी व पालवण, खेडमधील संगलट व मिर्ले आदी आठ केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आली होती. या केंद्रांवर पोलिसांसह सीआरपीएफ जवानांची विशेष तुकडी तैनात करण्यात आली होती. मात्र, कुठेही अनुचित प्रकार न घडल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
मतदारसंघात १ लाख ५ हजार ७४२ पुरुष व १ लाख २१ हजार ९६७ स्त्री असे एकूण २ लाख २७ हजार ७०९ मतदार आहेत. या निवडणुकीमध्ये ७४७ नवमतदारांची नोंद झाली आहे. अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादीचे उमेदवार भास्कर जाधव यांनी गुहागर शहरातील काही केंद्रांना भेट दिली. चौरंगी लढत असल्याने सर्वच पक्षांतील कार्यकर्ते उत्साहाने जास्तीत जास्त मतदान करुन घेण्याचा प्रयत्न करत होते. (प्रतिनिधी)

ग्रामीण मतदारांची वाट अजून बिकटच
संगमेश्वर तालुका : मतदार एकीकडे मतदान केंद्र दुसरीकडे

मतदारांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त होती. महिलांनी गटागटाने येऊन मतदानाचा हक्क बजावला. नवमतदारांनीही आपला हक्क बजावला.
आज कडाक्याचे ऊन असताना अनेक मतदार पायपीट करीत शेताच्या बांधावरुन व आडवाटेने उड्या मारीत आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर जात होते. दुर्गम भागात असणाऱ्या मतदान केंद्रावर मतदानासाठी जाताना मतदारांना कसरत करावी लागते.
चिपळुणातील ग्रामीण भागातही मतदारांचा उत्साह दांडगा होता. दूरवरून मतदार चालतच मतदानासाठी जाताना दिसत होते. सकाळी आणि सायंकाळी उत्साहाने मतदान झाले.

मतदान करून लगबगीने शेत गाठले
चिपळुणातील ग्रामीण भागात सध्या भातकापणीची कामे वेगाने सुरू आहेत. पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू असल्याने भातकापणीसाठी मिळणाऱ्या वेळेचे ‘सोने’ करण्याकडे ग्रामस्थांचा कल आहे. तरीही या शेतकऱ्यांनी मतदानाकडे पाठ न फिरवता आधी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यानंतर शेत गाठल्याचे दिसून येत होते.

दिवसभरातील मतदानाची आकडेवारी
सकाळी ९ वाजेपर्यंत १०%
११ वाजेपर्यंत १३%
१ वाजता ३१.१७%
३ वाजता ४९.१९%
५ वाजेपर्यंत ५४.२%
मतदान २ लाख ६२ हजार

कडक पोलीस बंदोबस्त
मतदारसंघात कोठेही कायदा व सुव्यवस्था स्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मतदानकेंद्राबाहेर कडक बंदोबस्त ठेवला होता. तसेच संवेदनशील ठिकाणीही बंदोबस्त होता. त्यामुळे कोठेही शांततेला गालबोट लावणारा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगण्यात आले.

कडवई शाळेच्या इमारतीत दोन मतदान केंद्र.
मुख्य रस्त्यापासून मतदान केंद्र १ किमी लांब.
मतदान केंद्राकडे जाण्यासाठीची पायवाटही अडचणीची असल्याने मतदारांची गैरसोय.

Web Title: Assembly election: Tarunikeachi enthusiast initiative for the polling process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.