कलात्मक विकासही महत्त्वाचा
By Admin | Updated: January 1, 2015 21:26 IST2015-01-01T21:26:43+5:302015-01-01T21:26:43+5:30
पेडणेकर : बांदा खेमराज मेमोरियलच्या स्नेहसंमेलनात फॅशन परेड

कलात्मक विकासही महत्त्वाचा
बांदा : स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये विविधांगी गुण आत्मसात करणे गरजेचे आहे. पुस्तकी ज्ञानाबरोबरच कलात्मक विकासही महत्त्वाचा आहे. खेमराज हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी फॅशन परेडमधून सादर केलेली कला कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर यांनी केले.
बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. याचे उद्घाटन पेडणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. व्यासपीठावर कार्याध्यक्ष आबासाहेब तोरसकर, पंचायत समिती सदस्य श्वेता कोरगावकर, स्वप्निल नाईक, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी एम. डी. मोरबाळे, कार्यकारिणी सदस्य रुपेश पंडित, समन्वय समिती सचिव देविदास मोरे, मुख्याध्यापक बी. व्ही. देसाई, शालेय समिती सदस्य सदानंद महाजन, उपमुख्याध्यापक शिवाजी दळवी आदी उपस्थित होते. प्रास्ताविक बी. व्ही. देसाई यांनी केले. यावेळी गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
माध्यमिक, उच्च माध्यमिक व इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांनी यावेळी पारंपरिक वेशभूषा साकारत फॅशन परेड सादर केली. तसेच स्वच्छता अभियान, अष्टविनायक दर्शन आणि दशावताराची झलक सादर करून वाहवा मिळविली.
आबासाहेब तोरसकर म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्था नेहमीच प्रयत्नशील असते. संस्था संचलित शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. याचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. यावेळी श्वेता कोरगावकर, स्वप्निल नाईक, रुपेश पंडित, एम. डी. मोरबाळे यांनी मनोगत व्यक्त केले. पर्यवेक्षक हनुमंत मालवणकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)