सावंतवाडी : महाराष्ट्रात एआय'चा वापर जास्तीत जास्त झाला पाहिजे तसेच शेतकऱ्यांना एआयचे ज्ञान मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील असून टप्प्याटप्याने एआयचा वापर सर्वच क्षेत्रात करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.आंबोली नांगरतास येथील ऊस संशोधन केंद्रात बैठकीसाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अप्पर पोलीस अधीक्षक रूषिकेश रावले, आमदार दीपक केसरकर, प्रांताधिकारी, तहसिलदार, आंबोली सरपंच यांच्यासह आदी उपस्थित होते.पवार म्हणाले, मागच्या वेळी कोल्हापूर दौऱ्यावर आलो होतो त्यावेळीच आंबोलीला यायचे निश्चित केले होते. येथील ऊस संशोधन केंद्राची पाहणी करून काही निर्णय घ्यायचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सर्वच क्षेत्रात एआयचा वापर टप्प्याटप्याने करण्यावर सरकारचा भर आहे. शेतकऱ्यांनी एआयचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. भविष्यात ऊस फळबागा या एआय पध्दतीने विकसित करण्यात येणार असून अर्थसंकल्पात ही एआयला भरघोस तरतूद करण्यात आली असून या नवीन तंत्रज्ञानाचा वापर सर्वच ठिकाणी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गेळे येथील ऊससंशोधन केंद्राची पाहणीउपमुख्यमंत्री अजित पवार हे सकाळी हेलिकॉप्टरने नांगरतास येथे दाखल झाल्यानंतर त्यांनी थेट गेळे येथील ऊस संशोधन केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेतला. तेथील रस्ते पाणी याबाबत ही चर्चा केली तसेच ऊसाच्या प्रजाती कशा वाढतील याकडे लक्ष देण्याची सूचनाही त्यांनी केली.
सर्वच क्षेत्रात 'एआय'चा वापर टप्प्याटप्याने करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
By अनंत खं.जाधव | Updated: March 27, 2025 15:46 IST