वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

By Admin | Updated: March 30, 2015 00:27 IST2015-03-29T21:16:58+5:302015-03-30T00:27:27+5:30

बांदावासीयांची मागणी : शेती नुकसानीबाबत वनखात्याकडून केवळ पंचनाम्याचा फार्स

Arrange wild animals | वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा

बांदा : बांदा शहर व परिसरात वन्य प्राण्यांकडून भातशेती तसेच बागायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वनखात्याकडून केवळ नुकसानीच्या पंचनाम्याव्यतिरिक्त कोणतीच कार्यवाही करण्यात येत नसल्याने या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी बांदा ग्रामस्थांनी वनपाल एस. एस. शिरगावकर यांच्याकडे शनिवारी सकाळी निवेदनाद्वारे केली.
शेतकऱ्यांना शेती नुकसानभरपाई प्रतिगुंठा केवळ २00 रुपये देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांची वनखात्याकडून चेष्टा करण्यात येत असल्याचा आरोप करत ही नुकसानभरपाई वाढवून मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी डॅनी आल्मेडा यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी शिरगावकर यांना जाब विचारला.गेले कित्येक दिवस बांदा शहरातील शेटकरवाडी, गडगेवाडी, वाफोली, आरोसबाग या भागात गवा, सांबर, डुक्कर यांचा मुक्त संचार असून या वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या शेती बागायतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या प्राण्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता या प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होण्याचे प्रकार घडले आहेत. या परिसरात शेतकऱ्यांनी नाचणी, मका, चवळी, भात आदी उन्हाळी पिके घेतली आहेत. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत शेती बागायती उद्ध्वस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असता वनखात्याकडे या प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी सामग्री नसल्याचे वनखात्याकडून सांगण्यात आले. वाढीव नुकसानभरपाई संदर्भात शेतकऱ्यांनी सावंतवाडी येथील वनकार्यालयात अर्ज देण्याची विनंती वनपाल शिरगावकर यांनी केली.यावेळी वनपाल एस. एस. शिरगावकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लिपिक व्ही. एम. मांजरेकर उपस्थित होते. यावेळी उमा शेटकर, प्रमोद कोचरेकर, बाबू शेटकर, घनश्याम परब, रामचंद्र केरकर, नारायण शेटकर, शैलेश शेटकर, गणपत सुभेदार, गुंडू सुभेदार, सुरेंद्र सुभेदार, अमेय नाईक, परशुराम वडार, संजू वडार, मनोज शेटकर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

अन्यथा आंदोलन
शेती नुकसानीबाबत वनखात्याशी संपर्क साधला असता केवळ पंचनाम्याचा फार्स करण्यात येतो. प्रत्यक्षात मात्र नुकसानभरपाईच्या कित्येक पट कमी रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. याबाबत वनखात्याने विचार करून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कायदेशीर मार्गाने आंदोलन उभारण्याचा इशारा डॅनी आल्मेडा यांनी दिला.

Web Title: Arrange wild animals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.