काँग्रेसमधील घुसमटीमुळेच सेनाप्रवेश
By Admin | Updated: February 2, 2015 00:16 IST2015-02-01T23:11:29+5:302015-02-02T00:16:15+5:30
संजय पडते : कुडाळ येथील पत्रकार परिषदेत सोडले टीकास्त्र

काँग्रेसमधील घुसमटीमुळेच सेनाप्रवेश
कुडाळ : काँग्रेस पक्षात नवीन आलेल्या लोकांनी आमच्याबाबत पक्षनेतृत्वाकडे गैरसमज पसरविले व नवीन आलेल्या नेतृत्वाने वेळोवेळी आमची घुसमट केली. त्यामुळे आपण काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला, असे सांगत नाव न घेता आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वावर टीका नव्यानेच शिवसेनेत गेलल्या संजय पडते यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत केली. गेले अनेक दिवस काँग्रेस पक्षात अस्वस्थ असलेले नारायण राणे यांचे खंदे समर्थक संजय पडते यांनी शनिवारी दुपारी मुंबई येथील ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. संजय पडते व त्यांच्या सोबत प्रवेश केलेल्या कुडाळच्या सरपंच स्नेहल पडते, माजी सरपंच प्रशांत राणे, ग्रामपंचायत सदस्य नंदू कुंटे, चेतन पडते, अभिषेक गावडे यांचे कुडाळ तालुका शिवसेनेच्यावतीने कुडाळ शिवसेना शाखेत रविवारी दुपारी जल्लोषी स्वागत करण्यात आले. यावेळी संजय पडते यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.यावेळी आमदार वैभव नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, युवा सेना जिल्हाध्यक्ष मंदार शिरसाट, माजी उपसभापती बबन बोभाटे, सुशील चिंदरकर, पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर, किरण शिंदे, नितीन सावंत, बंड्या सावंत, भाऊ पाटणकर व अन्य शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
जुन्या कार्यकर्त्यांवर होतोय अन्याय : पडते
गेली तीन ते चार वर्षांपासून पक्षात असलेल्या नवीन लोकांनी आमच्याबाबत पक्ष नेतृत्वाकडे गैरसमज पसरविले. नेतृत्वाने नवीन आलेल्यांना न्याय दिला, मात्र आमच्यासारख्या जुन्यांवर अन्याय केला, अशी खंतही पडते यांनी व्यक्त केली.
राणेंचे अनेक सहकारी सेनेत : नाईकयावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, नारायण राणेंबरोबर असलेले अनेक सहकारी त्यांच्यासोबत राहिले नसून अनेकजण शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. याच अनुषंगाने संजय पडतेही शिवसेनेत आले असून आम्ही त्यांचे स्वागत करतो. यापुढेही खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली अनेकजण शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत. उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट म्हणाले, संजय पडते यांच्याकडे उत्कृ ष्ट संघटन कौशल्य असून, त्यांच्या संघटन कौशल्याचा शिवसेनेला नक्कीच फायदा होईल.